US weather winter storm : निसर्गाच्या प्रकोपासमोर कुणाचेच काहीच चालत नाही. संपूर्ण जगात महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेला देखील या निसर्गाच्या प्रकोपासमोर झुकावे लागले आहे.  अमेरिकेत भयानक हिमवादळ आले आहे. मायनस 57 डिग्री तापमानात जीवंत राहण्यासाठी येथील नागरिकांची धडपड सुरु आहे. 'बॉम्ब'(Bomb) नावाच्या या हिमवादळाचा जबरदस्त तडाखा अमेरिकेला बसला आहे. या हिमवादळामुळे येथील जनजीवन ठप्प झाले आहे. यात 60 पेक्षा  जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या इतिहासात क्वचितच इतके भयंकर बर्फाचे वादळ आले आहे.  यापूर्वी 1983, 2014 आणि आता 2022 मध्ये तिसऱ्यांदा अशा प्रकारच्या हिमवादळाचा अमेरिकेला सामना करावा लागला आहे. संपूर्ण अमेरिकेला उत्तर ध्रुवासारखे स्वरुप आले आहे. अनेक भागात चार ते पाच फुटांपर्यंत बर्फ साचला आहे.  बर्फ हटवण्यासाठी मदत आणि बचाव कर्मचारी रात्रंदिवस 24 तास काम करत आहेत. लोकांची घरे, रस्ते, भिंती, खिडक्या, झाडे, झाडे, वाहने सर्व काही बर्फाखाली गाडले गेले आहेत.  


संपूर्ण अमेरिकेत हिमवादळामुळे आतापर्यंत 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. आर्क्टिक डीप फ्रीझमुळे हे बर्फाचे वादळ आले आहे. खबरदारी म्हणून सोमवारी संपूर्ण अमेरिकेत 3800 हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.  
ख्रिसमसच्या दिवशीच हे वादळ अमेरिकेत धडकले. या बॉम्ब सायक्लोनमुळं ठिकठिकाणी बर्फवृष्टी आणि तुफानी पाऊस पडत आहे. 


पिण्याचे पाणी देखील गोठले आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्यानं अनेक शहर अंधारात गेली आहेत. अत्यावश्यक सेवा देखील ठप्प झाल्या आहेत. शहरात सर्वत्र रस्त्यावर बर्फाचा खच पडला आहे. जेसीबी आणि बर्फ कटरच्यामदतीने बर्फ हटवण्याचे काम सुरु आहे. कडाक्याची थंडी आणि त्यात मोठी बर्फवृष्टीने असे दुहेरी संकटामुळे अमेरिकेचे नागरिक त्रस्त आहेत. आर्क्टिक प्रदेशातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे अर्ध्या अमेरिकेला बर्फाने वेढले गेले आहे.


जपानलाही हमवदाळाचा तडाखा


अमेरिकेपाठोपाठ कॅनडा आणि जपानलाही हिमतुफानाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. अक्षरशः स्नो अटॅक झाल्यासारखी परिस्थिती तिथं दिसत आहे. सगळीकडं पाहावं तिकडं बर्फाची पांढरीशुभ्र चादर पसरली आहे. बर्फवृष्टीचा कहर एवढा आहे की, जपानमध्ये आतापर्यंत 14 हून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. अनेक शहरांमध्ये पारा शून्याच्याही खाली उतरला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानं दहा हजाराहून अधिक घरांमध्ये वीज गायब झालीय. रस्ते, रेल्वे तसेच विमान वाहतूकसेवा ठप्प झालीय. घरातच कैद होण्याची पाळी जपानवासीयांवर आली आहे.