`या` देशात आढळला पहिला फ्लोरोनाचा रुग्ण
कोरोना, ओमायक्रोन ऐकलं असेल पण हे फ्लोरोना नेमकं काय आहे?
मुंबई : कोरोना आणि ओमायक्रॉनने जगभरात दहशत निर्माण केली आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये फ्लोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. फ्लोरोना हा COVID-19 आणि इन्फ्लूएंझाचं डबल इंफेक्शन आहे. अरब न्यूजने गुरुवारी ही माहिती दिली. दरम्यान, शुक्रवारी इस्रायलमध्ये कोरोनाविरुद्धच्या चौथ्या बूस्टर डोसला परवानगी देण्यात आली आहे.
इस्त्रायली मीडियानुसार, चार महिन्यांपूर्वी येथे कोरोनाच्या लसीचा बूस्टर डोस देण्यात आला होता. पण आता ओमायक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढत असताना, येथील सरकारने कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकसंख्येला चौथ्या बूस्टर डोसची परवानगी दिली आहे.
इस्रायलमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 1,380,053 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लोकांना साथीच्या आजाराने आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच वेळी, 1,349,030 लोक या आजारातून बाहेर आले आहेत. याठिकाणी अद्यापही 22 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, इस्रायलमध्येही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर पावले उचलली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे.