श्रीमंतांवरही येणार उपासमारीची वेळ ; 2050 साली निम्म्या लोकांचा भूकबळी?
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मुलभूत गरजा. मात्र आता याच गरजांवर एक भीषण संकट घोंगावतंय.
मुंबई : तुमचा आमचा भूकेनं बळी जाऊ शकतो. बसला ना धक्का. होय हे आणखी तीस वर्षांनी खरं ठरण्याची शक्यता आहे. लोकसंख्येचा 2050 मध्ये स्फोट होऊन अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार आहे. तुमच्याकडे पैसा असला तरी अन्न मिळेलच याची खात्री नसणार. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. (the world count report on food crisis)
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मुलभूत गरजा. मात्र आता याच गरजांवर एक भीषण संकट घोंगावतंय. पुढच्या 27 वर्षात जगातील अन्नधान्याचा साठा संपेल आणि मोठ्या प्रमाणात भूकबळींची संख्या वाढेल असा इशारा सामाजिक आणि आर्थिक विषयांवर काम करणाऱ्या 'द वर्ल्ड काऊंट'नं दिलाय. हे संकट इतकं मोठं असेल की लोकांना खाण्यासाठी मांसही शिल्लख राहणार नाही असाही दावा करण्यात येतोय.
द वर्ल्ड काऊंटच्या इशाऱ्यानुसार 2050 मध्ये जगभरातील लोकसंख्या तब्बल 1 हजार कोटींच्या आसपास असेल. वाढत्या लोकसंख्येनुसार अन्नधान्याची मागणी 70 टक्क्यानं वाढेल.
संपूर्ण जगभरात दरवर्षी शेकडो एकर जमीन नापीक होत आहे. गेल्या 40 वर्षात लागवडीखालील क्षेत्रापैकी 1/3 शेतीक्षेत्र संपुष्टात आलंय.
त्यामुळे अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी पुढील 40 वर्षात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन घ्यावं लागेल. 2030 मध्ये आजच्या तुलनेत तांदळाचे दर 130 टक्क्यांनी वाढलेले असतील तर मक्याचा भावही तब्बल 180 टक्क्यांनी वाढलेला असेल असा दावा या अहवालात करण्यात आलाय.
एकीकडे जगावर अन्नधान्य मोठं संकट आहे तर दुसरीकडे अन्नाची नासाडी होण्याचं प्रमाणही कमी नाही. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार जगातली प्रत्येक व्यक्ती दरवर्षी सरासरी 121 किलो अन्नाची नासाडी करते. 2019 या वर्षात जगभरात तब्बल 93 कोटी टन अन्नाची नासाडी झाली.
यावरून आपल्याला अन्नाचं महत्व अद्यापही कळलेलं नाही हे उघड आहे. त्यामुळे भविष्यात भूकबळीनं आपला जीव जावा असं वाटत नसेल तर अन्नधान्याबाबत प्रत्येकानं आतापासूनच सजग राहण्याची गरज आहे. नाहीतर सर्वांवरच उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.