3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मिठी मारल्यास...; विमानतळावरील अजब नियम! कारण फारच विचित्र
Airport Limits Hug Time For This Reason: या विमानतळावर लागू करण्यात आलेल्या नियमाचा साईन बोर्डही विमानतळ परिसरात लावण्यात आला आहे. हा नियम बरोबर कसा आहे याचं स्पष्टीकरणही विमानतळ अधिकाऱ्याने दिलं आहे.
Airport Limits Hug Time For This Reason: रेल्वे स्टेशन असो किंवा विमानतळ असो जाणाऱ्या प्रवाशाला निरोप देण्यासाठी आलेले नातेवाईक अनेकदा वेळेच्या आधी येऊन या ठिकाणी टाइमपास करता किंवा रेंगाळताना दिसतात. मात्र अशाच सोडायला आलेल्या नातेवाईकांविरुद्ध आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेतला आहे, न्यूझीलंडमधील ड्युनेडिन विमानतळाने! या विमानतळावर एक विचित्र नियम लागू करण्यात आला आहे. येथे तीन मिनिटांपेक्षा अधिक वेळ कोणालाही एकमेकांना मिठी मारता येणार नाही, असं विमानतळ प्रशासनाने जाहीर केलं आहे. हा नियम ड्रॉफ-ऑफ झोन म्हणजेच प्रवाशांना निरोप देण्यासाठी राखीव असलेल्या जागेसाठी लागू करण्यात आला आहे. हा नियम लागू करण्यामागील एक फारच रंजक कारण विमानळ प्रशासनाने सांगितलं आहे.
थेट साईन बोर्डच लावला
ड्युनेडिन विमानतळ प्रशासनाने निरोप घेताना बराच वेळ बोलायचं असेल तर काय करावं याचा पर्यायही आपल्या निर्देशांमध्ये सांगितलं आहे. सोडायला आलेल्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी जास्त वेळ लागणार असेल तर पार्किंग लॉटमध्येच एकमेकांबरोबर अधिक वेळ घालवा, असं विमानतळ प्रशासनाने सुचवलं आहे. ड्युनेडिन विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनिअल डी बोनो यांनी एनएनझेड रेडिओला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा नियम का बनवण्यात आला आहे याबद्दल भाष्य केलं आहे. विशेष म्हणजेच या विमानतळावर, "मिठीची जास्तीत जास्त वेळ 3 मिनिटं" असा साईन बोर्ड लावण्यात आला आहे. तसेच यावर निरोप घेण्यासाठी जास्त वेळ लागणार असेल तर कार पार्किंगचा वापर करा, असंही प्रवासी आणि त्यांच्या नातेवाईकांना सुचवलं आहे.
जास्त वेळ घेतला तर...
या नव्या नियमामागील तर्क सांगताना विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनिअल यांनी विमानतळं ही भावूक होण्यासाठी सर्वोत्तम जागांपैकी एक आहे, असं म्हटलं आहे. डॅनिअल यांनी एका अभ्यासाचा संदर्भ देताना, 20 सेकंदांची मिठी ही लव्ह हार्मोन म्हणून ओळखलं जाणारं ऑक्सिटॉनिक रिलीज करण्यासाठी पुरेशी असते असंही सांगितलं. डॅनिअल यांनी मिठी घालण्याच्या वेळावर बंधन आणल्यास दिलेल्या वेळात अधिक लोकांना मिठी मारता येईल. त्यामुळे त्यांनाही या 20 सेकंदांच्या तर्कानुसार आनंद घेता येईल, असा युक्तीवाद डॅनिअल यांनी निर्णयाचं समर्थन करताना केला आहे. ज्यांना निरोप घेण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे त्यांच्यासाठी आम्ही विमानतळाच्या पार्किंगमध्ये सोय केली असल्याचंही डॅनिअल यांनी म्हटलं आहे. या भागामध्ये 15 मिनिटांसाठी मोफत प्रवेश दिला जात असल्याचं विमानतळ प्रशासनाने सांगितलं आहे. यापेक्षा अधिक वेळ लावल्यास फी आकारली जाणार आहे. म्हणजेच आपल्याच प्रिय व्यक्तीला सोडायला आल्यावर निरोप घेण्यासाठी अधिक वेळ लावला, अधिक वेळ मिठी मारण्यात घालवला तर चक्क पैसे मोजावे लागतील असा सरळ हिशोब आहे.
यावर लोकांचं म्हणणं काय?
ड्युनेडिन विमानतळाच्या या नव्या नियमावर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहे. सोशल मीडियावर काहींनी या नव्या नियमाचं स्वागत करताना आटोपता निरोप घेणं कधीही चांगलं असतं असं सांगितलं आहे. मात्र काहींनी हे असं मिठीला वेळेच्या बंधनात अडकवणं अमानवीय असल्याचं म्हटलं आहे.