16000 घोड्यांचं Death Warrant! हेलिकॉप्टरमधून गोळ्या झाडून करणार खात्मा; कारणही आलं समोर
Plan Kill Thousands Of Horses By Shooting From Helicopters: स्थानिक सरकारने यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला असून खरोखरच सरकारकडून असे आदेश देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.
Plan Kill Thousands Of Horses By Shooting From Helicopters: पाळीव प्राण्यांपैकी सर्वात वेगवान प्राणी म्हणजे घोडा. अगदी शर्यतीपासून ते लग्न समारंभांपर्यंत दिसणारा हा प्राणी फारच माणसाळलेल्या पाळीव प्राण्यांपैकी एक. मात्र याच प्राण्याविरोधात ऑस्ट्रेलिया सरकारने एक आदेश जारी केला आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने तब्बल 16 हजार घोड्यांना गोळ्या झाडून ठार करण्याचे आदेश जारी केले आहेत.
नेमके कोणी आणि काय आदेश दिलेत?
ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स सरकारने हे आदेश जारी केले आहेत. कोसियुज्को राष्ट्रीय उद्यानामध्ये जवळपास 19 हजार जंगली घोढे आहेत. या घोड्यांना ऑस्ट्रेलियामध्ये 'ब्रुम्बीज' असं म्हटलं आहे. 2027 पर्यंत या घोड्यांची संख्या नियंत्रणात आणण्याचा सरकारचा मानस आहे. 2027 पर्यंत आताच्या 19 हजारांवरुन ही संख्या केवळ 3 हजारांपर्यंत राहिली पाहिजे असं सरकारचं नियोजन आहे. यासंदर्भातील माहिती न्यू साऊथ वेल्सच्या पार्यावर मंत्री पेनी शार्प यांनी दिली. या घोड्यांची संख्या कमी करण्यासाठी तसेच नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक सरकारने अनेक उपाययोजना केल्या असं पेनी शार्प यांनी सांगितलं. या घोड्यांना हळूहळू संपवलं जात आहे. यापैकी शेकडो घोड्यांना दुसऱ्या जागी स्थलांतरित केलं आहे. मात्र एवढं करुनही या घोड्यांशी संख्या नियंत्रणात राहत नाही. सध्याचा नैसर्गिक समतोल या घोड्यांची संख्या वाढल्यास बिघडू शकतो. त्यामुळे यासंदर्भात मोठा निर्णय घेणं आवश्यक आहे असा युक्तीवाद पेनी शार्प यांनी केला. मागील 20 वर्षांमध्ये या घोड्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. घोड्यांची संख्या भरमसाठ वाढल्याने येथील स्थानिक प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.
पर्यावरणप्रेमींना वेगळीच भीती
न्यू साउथ वेल्स सरकारने दिलेल्या माहितीनुसार सन 2020 मध्ये या घोड्यांची संख्या 14 हजार 380 इतकी होती. मात्र 2022 मध्ये ही संख्या 18 हजार 814 वर पोहोचली. योग्य उपाययोजना वेळीच करण्यात आल्या नाही तर या घोड्यांची संख्या 50 हजारांहून अधिकचा टप्पा ओलांडेल अशी भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.
कसं होतं नुकसान?
सरकारने दिलेल्या माहितीनुसार ब्रुंबीज हे रानटी प्रजातीचे घोडे पाण्याचे स्रोत तसेच शेतमालाचे नुकसान करतात. यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या घोड्यांनी धुडगूस घातल्याने कोरोबोरी बेडूक, रुंद जबडा असलेली येथील उंदारांची स्थानिक प्रजाती तसेच दुर्मिळ अल्पान ऑर्किड उद्धवस्त होतात. सरकारने या घोड्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आता थेट हवेतून या घोड्यांना गोळ्या झाडून ठार करण्याचे आदेश जारी केले आहेत. घोड्यांची संख्या नियंत्रणात राहिली तरच जंगलाचा समतोल राखता येईल असं स्थानिक सरकारचं म्हणणं आहे. हेलिकॉप्टरमधून या घोड्यांना गोळ्या झाडल्या जाणार आहेत. यापूर्वीही अनेकदा अशाप्रकारे घोड्यांना हेलिकॉप्टरमधून गोळीबार करुन संपवण्यात आलं आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच घोड्यांना संपवलं जाणार आहे.