...म्हणून पाकिस्तान वायुदलाचा भारतावरील हल्ला फसला
हल्ला झाला तेव्हा.....
नवी दिल्ली : पुलवामा येथे करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर जवळपास बारा दिवसांनंतर भारतीय वायुदलाने या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं. पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. भारताच्या या हल्ल्यानंतर हादरलेल्या पाकिस्ताननेही थेट वायुदलाच्या मदतीने भारतीय हवाई हद्द ओलांडत सैन्यदलाच्या तळांवर हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला पण, यात ते अपयशी ठरले. पाकिस्तानच्या वाट्याला नेमकं अपयश का आणि कसं आलं, याचा खुलासा 'एएनआय' या वृत्तसंस्थेने केला आहे.
सरकारशी आणि या संपूर्ण कारवाईशी संबंधित असणाऱ्या सूत्रांचा हवाला देत याविषयीचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या वायुदलाने वीसहून अधिक विमानांच्या सहाय्याने भारतीय हवाई हद्द ओलांडत सैन्यदल तळांवर हल्ले केले. त्यांच्या विमानांच्या ताफ्यात अमेरिकन बनावटीच्या एफ १६, फ्रेंच बनावटीच्या मिराज IIIs आणि चिनी बनावटीच्या जेएफ १७ या विमानांचा समावेश होता. पाकिस्तानच्या या ताफ्याने एच-४ हे जवळपास १००० किग्रॅ वजनाचे ११ बॉम्बहल्ले केले. तीन स्थळांवर, ५० किमीपर्यंतच्या अंतरावर टाकण्यात आलेल्या या बॉम्बने लक्ष्यावर अचूक मारा करण्यात मात्र पाकिस्तान अपयशी ठरलं.
भारतीय वायुदलाने बालाकोट हल्ल्यात स्पाईस २००० ने ज्याप्रमाणे हल्ला केला होता, त्याचप्रमाणे मिराज IIIs मार्फत पाकिस्तान वायुदलाने एच-४ चा मारा केला. पाकिस्तानकडून वापर करण्यात आलेले हे बॉम्ब दक्षिण आफ्रिकेच्या मदतीने तयार करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. पण, पाकिस्तानकडून मारा करण्यात आलेल्या या बॉम्बना लक्ष्यभेद करता आला नाही हेच खरं.
पाककडून करण्यात आलेल्या एका हल्ल्यात जम्मू- काश्मीर भागातील लष्कराच्या तळाला लक्ष्य करण्यात आलं होतं. पण, त्या तळाला एका भल्यामोठ्या वृक्षाचं सुरक्षा कवच होतं. ज्याचं या हल्ल्यात नुकसान झालं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पूंछ आणि आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या भारतीय सैन्याच्या तळांवर यावेळी निशाणा साधण्यात आला, तेव्हा काही वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. ज्या ठिकाणी हल्ले झाले तेथे पाकिस्तानकडून टाकण्यात आलेल्या बॉम्बचे अवशेष हस्तगत करण्यासाठी आणि हल्ल्याचे परिणाम जाणून घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून काही अधिकाऱ्यांची समितीही स्थापन करण्यात आली.
ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताकडून क्षणार्धातच पाकिस्तानी वायुदलाला सडेतोड उत्तर देण्यात आल्यामुळे त्यांना निर्धारित ठिकाणी हल्ला करणं शक्य झालं नाही. परिणामी एच-४चे बॉम्बहल्ले चुकिच्या ठिकाणी करण्यात आले आणि पाकिस्तानतला आणखी एक दणका मिळाला.
२७ फेब्रुवारीला पाकिस्तानमधील विविध तळांवरुन वायुदलाच्या या विमानांचं उड्डाण करण्यात आलं होतं. ज्यानंतर पुढे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या उत्तर भागात हा ताफा एकत्र आला आणि पुढे त्यांनी भारतीय सैन्यदल तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात एफ- १६ चा वापर हवेतल्या हवेत मारा करणाऱ्या भारतीय लढाऊ विमानांचा सामना करण्यासाठी केला गेला. तर, मिराज IIIs चा वापर हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी केला गेला होता. दोन्ही देशांच्या वायुदलांमध्ये झालेल्या या चकमकीतच पाकिस्तानच्या एफ-१६ वर विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या मिग-२१ मधून निशाणा साधण्यात आला होता. आर-७३ या हवेतल्या हवेत मारा करणाऱ्या मिसाईलने त्यांनी पाकच्या लढाऊ विमानावर निशाणा साधला होता.
पाकिस्तानकडून मारा करण्यात आलेल्या ऍमरामला बगल देण्यासाठी सुखोईचाही वापर केला गेल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे एकंदर भारताकडून तातडीने मिळालेल्या उत्तरामुळे पाकिस्तानचा हवाई हल्ला अपयशी ठरल्याचं स्पष्ट होत आहे.