जिनिव्हा: जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO च्या प्रमुखपदी असणाऱ्या टेड्रोस अदनोम गेब्रेयसस (WHO Chief Ghebreyesus) यांनी संपूर्ण जगाला एक अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. coronavirus कोरोना व्हायरसशी साऱ्या जगाचा संघर्ष सुरु असतानाच हे संकट येत्या काळात शमल्यानंतर आव्हानं कमी होतील असा जर तुमचा समज असेल तर, गाफील राहून चालणार नाही असा इशाराच जणू त्यांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना ही अखेरची महामारी किंवा वैश्विक संकट नसेल. तर, संपूर्ण जगालाच भविष्यात येणाऱ्या संकटांसाठी तयार राहावं लागणार आहे. शिवाय भविष्यात कोणत्याही संकटाशी दोन हात करण्यासाठी म्हणून आरोग्य सेवांमध्ये सर्व राष्ट्रांनी गुंतवणूक करणं महत्त्वाचं असेल. 


गेब्रेयसस यांनी माध्यमांना संबोधित करत म्हटलं, 'ही अखेरची महामारी नसेल. इतिहासानं आपल्याला शिकवलं आहे की महामारी हा जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. पण, पुढच्या वेळी महामारीचं असं संकट आल्यास आपणा सर्वांनाच त्यासाठी तयार रहावं लागणार आहे. प्रगतीपथावर असतानाही काही राष्ट्रांनी सार्वजनिक आरोग्य कार्यप्रणालीवर योग्य दिशेनं लक्ष दिलेलं नाही ही बाब अधोरेखित करत त्यांनी सर्वच राष्ट्रांनी जनआरोग्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी असा महत्त्वाचा सल्ला दिला. 


११ मार्चला कोरोना जागतिक महामारी असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं


जागतिक आरोग्य संघटनेकडून ११ मार्चला कोरोना व्हायरस संक्रमणाला वैश्विक महामारी म्हणून घोषित केलं होतं. दरम्यान, सध्याच्या घडीला संपूर्ण जगात या महामारीमुळं 890,000 हून अधिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अमेरिकेमागोमाग आता सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. 


 


दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या सध्या प्रशासन आणि आरोग्य विभागापुढे असणारी आव्हानं वेगानं वाढवत आहे. मुळात संपूर्ण जगभरातून आता सर्वांच्याच नजरा कोरोनावर मात करणारी प्रभावी लस कधी विकसित होते याकडे लागलं आहे. मागील वर्षापासून डोकं वर काढलेल्या या कोरोना व्हायरसच्या संकटानं जनजीवनासोबतच जागतित आर्थिक व्यवहारांवरील ताणही लक्षणीयरित्या वाढला आहे. अनेक राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोलमडून पडल्या आहेत.