न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एका वाघिणीलाही कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत सध्या कोरोना रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आता या ठिकाणी प्राण्यांनाही कोरोनाची लागण होताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत १२०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाईल्ड लाईफ कंझर्वेशनच्या ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयाच्या म्हणण्यानुसार यठिकाणी एका वाघीणीलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खबरदारी उपाय म्हणून हा प्राणीसंग्रहालय १६ मार्चपासून बंद ठेवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची लागण झालेल्या या वर्षीय वाघिणीचे नाव मयल असे आहे. मयल शिवाय आणखी ५ वाघ आणि सिंहांमध्ये कोरोणाची लक्षणं दिसून आली आहेत. यामध्ये तीन अफ्रिकन  सिंहांचा समावेश आहे. तर त्यांची ठणठणीत होण्याची दाट शक्यता ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयाकडून वर्तवण्यात आली आहे. 


ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयाच्या एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे या प्राण्यांना कोरोनाची लागण  झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे इतर कोणत्याच प्रण्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली नसल्याचं सांगण्यात येत आहे. 


माणसांनंतर आता प्राण्यांमध्ये देखील कोरोना व्हायरसचा शिरकाव होत असल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत संपूर्ण जगात १,२७४,१९९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तब्बल ६९,४६८ लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे २६४,८३३ रुग्ण या धोकादायक आजारातून सुखरूप बाहेर पडले आहेत.