समुद्रातून जोरात आवाज येतोय; Titanic चे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीबाबत मोठी Update
Titanic Submarine : चित्रपटातून दाखवण्यात आलेलं टायटॅनिक जहाज प्रत्यक्षात नेमकं कसं असेले हे पाहण्याची संधी आतापर्यंत काही मंडळींना मिळाली. पण, याच संधीनं काहींना धोक्यातही टाकलं.
Titanic Submarine : सध्या संपूर्ण जगभरात एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे. ती म्हणजे टायटॅनिक (Titanic ) पाहण्यासाठी गेलेल्या आणि एकाएकी लुप्त झालेल्या पाणबुडीची. ज्यामुळं साऱ्या जगातून चिंता व्यक्त केली जात आहे. ज्याप्रमाणं टायटॅनिक जहाजाला आणि त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जलसमाधी मिळाली त्याप्रमाणं या पाणबुडीसोबत होऊ नये अशीच प्रार्थना सर्वजण करताना दिसत आहेत.
साधारण पाच दिवसांपासून अटलांटिक महासागरात ही पाणबुडी बेपत्ता आहे. ज्यामध्ये पाच प्रवासी असल्याची माहिती मिळतेय. पाणबुडीमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण अतिशय कमी असल्यामुळं त्यात असणाऱ्या प्रवाशांबद्दच चिंता दर दिवसागणिक वाढतच चालली आहे. सदर प्रकरणाची माहिती मिळताच बचाव आणि शोधपथकांनी पाणबुडीचा शोध घेण्याची मोहिम हाती घेतली असली तरीही त्यांना यात यश लाभलेलं नाही. किंबहुना समुद्रातून एकाएकी काहीतरी आदळलं जाण्याचे आवाज आल्यामुळं आता शोधपथकंही संभ्रमात आली आहेत.
हेसुद्धा वाचा : कसलं भारी...! 111 वर्षांपूर्वीच्या Titanic मधील मेन्यूकार्ड समोर, काही पदार्थांची नावंही उच्चारताना बोबडी वळतेय
त्या गुढ आवाजानं वाढवली भीती...
US Coast Guard नं सदरील पाणबुडीचा शोध सुरु असतानाच त्या क्षेत्रात ही मोहिम पार पडत होती त्या अटलांटिक महासागराच्या उत्तर भागामध्ये कॅनडियन विमानांना साधारण अर्ध्या तासांच्या वेळात काही आदळण्याचे आवाज ऐकू आले. ज्यानंतर पाण्यामध्ये सुरु असणारी शोधमोहिम या आवाजांच्याच दिशेनं वळवण्यात आली. असं असूनही अद्याप पाणबुडीचा शोध मात्र लागलेला नाही.
पाणबुडीतील ऑक्सिजन मर्यादित असल्यानं चिंता वाढली...
कॅनडाच्या न्यूफाउंडलँडनजीक असणाऱ्या, समुद्राच्या तळाशी असणाऱ्या टायटॅनिक या महाकाय जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी निघालेली पाणबुडी अचानकच संपर्काबाहेर गेली आणि बेपत्ताही झाली. त्या क्षणापासून आतापर्यंत मिनिटामिनिटाला चिंता वाढत आहे. कारण, पाणबुडीत ठराविक काळासाठी पुरेल इतकाच ऑक्सिजनसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे. शोधपथकांमध्ये सहभागी असणाऱ्या स्थानिक सरकारी संस्थांनी केलेल्या दाव्यानुसार आता साधारण 20 ते 25 तास पुरेल इतकाच ऑक्सिजनसाठा पाणुडीमध्ये असून, पुढचे काही तास संकटं वाढवणारे असतील.
अमेरिकेच्या तटरक्षक दलानं दिलेल्या माहितीनुसार पाणबुडीच्या मदतीसाठी असणाऱ्या पोलर प्रिन्स आणि डीप एनर्जी या जहाजांनीही खोल समुद्रात शोधमोहिम हाती घेतली असून, यामध्ये ते एका यंत्रमानवाची मदतही घेत आहेत. पण, दुर्दैवानं ओशनगेट कंपनीच्या टायटन नामक बेपत्ता पाणबुडीबाबतची कोणतीही माहिती मात्र समोर येऊ शकलेली नाही.
पाणबुडीमध्ये कोण करतंय प्रवास?
माध्यमांकडे उपलब्ध माहितीनुसार या पाणबुडीत पाकिस्तानी अब्जाधीश शहज़ादा दाऊद, त्यांचे सुपुत्र सुलेमान, ब्रिटनचे व्यावसायित हामिश हार्डींग यांच्यासह ओशनगेट कंपनीचे सीईओ स्टॉकटन रश, फ्रेंच संशोधक पॉल आनरी नार्जेलेट प्रवास करत असल्याचं म्हटलं जात आहे.