काटे नव्हे, तर ही आहे आपल्या घरातल्या पाळीव प्राण्याची जीभ, डॉक्टरने शेअर केला क्लोज-अप व्हिडिओ
Cat`s Tongue Close Up Video: फ्लोरिडाच्या एका पशुवैद्यक डॉक्टरने गोंडस दिसणार्या मांजरीच्या जिभेचा क्लोज-अप व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे नेटिझन्स थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून काहीजण चक्रावले आहेत, तर काहींनी जिभेच्या गुंतागुंतीची रचना पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे.
Cat's Tongue Close Up Video: अनेकांना घरात कुत्रा किंवा मांजर पाळायला आवडते. भारत सरकारच्या नियमानुसार पाळीव मांजर असो की कुत्रा असो त्यासाठी पाळीव प्राण्याची (Pets) नोंदणी करणं आवश्यक आहे. या नियमानुसार घरात एक किंवा दोन पाळीव प्राणी ठेवता येतात. आपल्या पाळीव प्राण्यांचा त्यांच्या मालकांना प्रचंड लळा असतो. यात मांजरांचं आपल्या मालकांवर विशेष प्रेम असंत. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मांजरी मालकाला चाटताना आपण अनेकवेळा पाहिलं असेल किंवा अनुभवलं असेल. पण तुम्ही कधी गोंडस दिसणाऱ्या मांजरीची जीभ अगदी जवळून पाहिली आहे का? मांजरीची सामान्य दिसणारी जीभ जवळून पाहिल्यास कदाचित तुम्ही चक्रावून जाल. एका पशुवैद्यक डॉक्टरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. तर काहींनी मांजरीच्या जिबेच्या गुंतागुंतीची रचना पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे.
हा व्हिडिओ फ्लोरिडाचे प्रसिद्ध पशुवैद्यक पीटर कार्लोस यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) शेअर केला आहे. यात पहिल्यांदाच मांजरीच्या जीभेचा क्लोज व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. मांजरीच्या जीभेवर शेकडो काटे (Spikes) असल्याचं या दिसतंय. याला पैपिला असं म्हटलं जातं. मांजरीच्या जीभेची अत्यंत क्लिष्ट रचना यात पाहिला मिळतेय. या व्हिडिओवर अनेक कमेंट करण्यात आल्या आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर आश्चर्य व्यक्त केलं आहे.
नॅशनल जिओग्राफिकच्या म्हणण्यानुसार, हे काटे मांजरीला तोंडातून निघणारी लाळ फरपर्यंत पोहोचवण्यास मदत करतात. ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे मांजर केवळ तिची त्वचा स्वच्छ करत नाही तर शरीराचं तापमान देखील नियंत्रित करते. जॉर्जिया टेक बायोइंजिनियर डेव्हिड हू यांनी मांजरीची जीभ स्मार्ट कंगवासारखी काम करते असं म्हटलं आहे.
पीटर कार्लोस यांच्या या व्हिडिओला लाखोंनी लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका मांजरप्रेमीने म्हटलं, मला मांजरी खूप आवडतात, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी विचारात पडलो आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलंय ही जीभ नाही तर हा एक ब्रश वाटतोय.
मांजरीच्या जीभेवर काटे वाटत असले तरी ते अत्यंत मऊ असतात त्यामुळ मनुष्याला कोणतीही इजा होत नाही असंही तज्ज्ञांनी म्हटंलय.