सावधान! तुमच्या मुलांचा जीव धोक्यात, सोशल मीडियावर `वन चिप चॅलेंज`...14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Viral One Chip Challenge: सोशल मीडियावरच्या एका चॅलेंजमुळे 14 वर्षांच्या मुलाचा हकनाक जीव गेला. वन चिप चॅलेंज असं याचं नाव असून सोशल मीडियावर ते ट्रेंडमध्ये आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्याच्या नादात अल्पवयीन मुलाला जीव गमवावा लागल्याने खळबळ उडाली आहे.
Viral One Chip Challenge: इंटरनेटचा (Internet) वापर जितका आयुष्य समृद्ध करणारा आहे तितकाच तो जीवावर बेतणाराही ठरतो. घरबसल्या आपल्याला जगातील लहान-मोठा गोष्टींची माहिती अगदी सहज मिळते. पण याचा वापर वाईट गोष्टींसाठी झाला तर मग हे माध्यम धोकायक ठरू शकतो. सोशल मीडियावर दररोज काही ना काही गेम्स येत असतात. यातून युजर्सना काही चॅलेंज दिले जातात. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी काही वेळा जीवाचीही पर्वा करत नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर दिलेलं चॅलेंज पूर्ण करताना एका 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर (Social Media) सध्या वन चिप चॅलेंज (One Chip Challenge) ट्रेंडमध्ये आहे. हेच चॅलेंज पूर्ण करताना या मुलाचा मृत्यू झाला. अमरिकेत (America) ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्यू झालेल्या मुलाचं नाव हॅरिस वोलोबा असं असून ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला त्यादिवशी त्याने वन चिप चॅलेंजमध्ये भाग घेतला होता. हॅरिस वोलोबाचा मृतदेह पोस्टमॉर्टेम रिपोर्टसाठी पाठवण्यात आला. रिपोर्टनुसार हॅरिसच्या मृत्यूचं कारण अतिशय धक्कादायक आहे.
मृत्यूचं धक्कादायक कारण
पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार हॅरिसचा मृत्यू अतिशय तिखट पदार्थ खाल्यामुळे झाला. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता हॅरिसने शाळेत तिखट चिप्स खाल्ले. त्यानंतर त्याच्या पोटात दुखू लागलं. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात उपचारानंतर त्याचा प्रकृतीत सुधारणा झाली. रुग्णालयातून घरी आल्यानंतर पून्हा त्याची तब्येत बिघडली आणि त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याआधीही वन चिप चॅलेंजची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. गेल्या वर्षी कॅलिफोर्नियातील एका शाळेत 3 विद्यार्थ्यांनी वन चिप चॅलेंजमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. शाळेच्या मुख्याध्यपकांनी दिलेल्या माहितीनुसार या तीनही विद्यार्थ्यांना सारखाच त्रास झाला होता. मसालेदार चिप्स खाल्याने या विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला,काही विद्यार्थ्यांना उलट्याही झाल्या.
वन चिप्स चॅलेंज काय आहे?
वन चिप्स चॅलेंजमध्ये मुलांना एक टास्क दिला जातो. अतिशय तिखट आणि काळी मीरीपासून बनवण्यात आलेले चिप्स खावे लागतात. यात भाग घेणाऱ्या मुलाला त्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट करावा लागतो. हा व्हिडिओ पोस्ट करताना #onechipchallenge या हॅशटॅगचा वापर केला जातो. हे चॅलेंज सोशल मीडियावर सध्या ट्रेंड होत आहे. या चॅलेंजच्या नादात अनेक तरुण मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.