सोल : अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संघर्षाचे कवित्व जगाला नवे राहिले नाही. त्यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचीही जगाने सवय करून घेतली आहे. असे असले तरी, त्यातील गांभीर्य मुळीच कमी होत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा उत्तर कोरियाला इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण कोरियाच्या नॅशनल अॅसेंब्लीतून बोलताना ट्रम्प यांनी उत्तर कोरियावर बुधवारी जोरदार निशाणा साधला. आपल्या भाषणात इशारा देताना ट्रम्प म्हणाले, किम जोंग उनच्या अतिअण्वस्त्र लालसेपोटी उत्तर कोरियाचा विनाश होऊ शकतो. किंम जोंग जी शस्त्रं बाळगत आहेत ती, मुळीच सुरक्षित नाहीत. ती उत्तर कोरियाला विनाशाकडे घेऊन चालली आहेत. तुम्ही जितके अंधाराकडे वाटचाल कराल तितक्याच तुमच्या अडचणीही वाढत जातील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.


ट्रम्प यांनी आपल्या भाषणात हुकूमशहा किम जोंग आणि त्याच्या अण्वस्त्रलालसेविरूद्ध तीव्र शब्दांत टीका केली. उत्तर कोरियाने वॉशिंग्टनच्या ताकतीची बरोबरी करू नये. अमेरिकेतील सध्याचे सरकार यापूर्वीच्या सर्व सरकारांपेक्षा वेगळे आहे. आज मी जे उत्तर कोरियाबद्धल बोलतो आहे ते केवळ माझ्या देशाच्या वतीने नाही. तर, सभ्य आणि चांगले वर्तन करणाऱ्य सर्व देशांच्या वतीने मी बोलत आहे. आम्हाला कमजोर समजू नका. आणि त्या गैरसमजातून आमची परिक्षा घेऊ नका, असा स्पष्ट इशारा ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दिला आहे.


दरम्यान, गेल्या २४ वर्षात पहिल्यांदाच अमेरिकेच्या एखाद्या राष्ट्राध्यक्षाने दक्षिण कोरियाच्या संसदेत भाषण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्रम्प यांनी यापूर्वही उत्तर कोरियाला अनेकदा इशारे दिले आहेत. मात्र, हे इशारे उत्तर कोरियाने वेळोवेळी उडवून लावले आहेत. हेही वास्तव आहे.