ब्युरो रिपोर्ट :  जागतिक आरोग्य संघटनेचा निधी थांबवण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय धोकादायक आहे, अशा शब्दांत मायक्रोसॉप्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयावर अमेरिकेत वाढती टीका होऊ लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं वेळीच योग्य पावलं उचलली नाहीत, असा आरोप करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून या संघटनेला दिला जाणारा निधी थांबवण्याची घोषणा मंगळवारी केली होती.


डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयावर अनेक स्तरातून टीकेती झोड उठवण्यात येत आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही याबाबत ट्रम्प यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ट्वीट करून त्यांनी ट्रम्प यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला.


बिल गेट्स यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, जेव्हा जग मोठ्या आरोग्य संकटात आहे अशा वेळी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखणं धोकादायक आहे. जागतिक आरोग्य संघटनेचं काम थंडावलं तर कोविड-19 चा फैलाव वाढेल आणि जर जागतिक आरोग्य संघटनेचं काम थांबलं तर दुसरी कुठली संस्था WHO ची जागा घेऊ शकणार नाही. कधी नव्हे एवढी आता WHOची जगाला गरज आहे.


 



जिनेव्हामध्ये मुख्यालय असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेसाठी अमेरिका मोठी देणगीदार आहे. २०१९ मध्ये अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला ४०० मिलियन डॉलर इतकी मदत केली होती, जी जागतिक आरोग्य संघटनेच्या बजेटच्या सुमारे १५ टक्के इतकी आहे.


 



चीनने दिलेली चुकीची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने पुढे केली. त्यामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव अधिक झाला, अन्यथा तो रोखता आला असता अशी टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचं किमान कर्तव्य पार पाडलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना जबाबदार धरलंच पाहिजे असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे.