तुर्कस्तानमध्ये चौथ्यांदा लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा
कोरोनाचा तुर्कस्तानमध्ये थैमान
नवी दिल्ली : कोरोनाचा तुर्कस्तानमध्ये थैमान सुरुच आहे. येथे आतापर्यंत 2900 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, पुन्हा एकदा तुर्कस्तानमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.
तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान यांनी देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गासंदर्भात 31 प्रांतांमध्ये 1 मेपासून तीन दिवसाचे लॉकडाउन जाहीर केले आहे. तुर्कीच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण 1 लाख 12 हजार 261 प्रकरणे समोर आली आहेत. येथे 33 हजार 791 लोकं बरे झाले आहेत ही तुर्कीसाठीची दिलासा देणारी बाब आहे. तर 2900 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
1 मे ते 3 मे लॉकडाऊन जाहीर
वृत्तसंस्था सिन्हुआने आपल्या अहवालात म्हटले आहे की, एर्दोगान यांनी सोमवारी इस्तंबूल येथे कॅबिनेट बैठकीनंतर सांगितले की, आठवड्याच्या शेवटी अजूनही सुरू असलेला कर्फ्यू ईद-उल-फितर संपेपर्यंत चालू राहील.
तुर्कस्तानचे अध्यक्ष म्हणाले की, देशातील जीवन सामान्य होण्यासाठी सरकार सर्वसमावेशक योजना तयार करीत असून लवकरच जनतेला त्याविषयी माहिती देण्यात येईल. 11 ते 12 एप्रिल दरम्यान तुर्कस्तानमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आले. यानंतर 18 ते 19 एप्रिल आणि पुन्हा 23 ते 26 एप्रिल रोजी चार दिवसांचे कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
दरम्यान, तुर्कस्तान आंतरराष्ट्रीय समुदायात आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. तुर्कस्तानने 5,00,000 मास्क, 4000 पीपीई किट, 2000 लिटर जंतुनाशक, 1500 गॉगल आणि 400 एन -95 मास्क अमेरिकेला पाठवले आहेत. आतापर्यंत त्यांनी ब्रिटेन, इटली, स्पेनसह 55 देशांना हे मदत पाठवली आहे.