लंडन : एखादी बऱ्यापैकी स्थिर अर्थव्यवस्था, स्थिर राजकीय स्थिती एखाद्या महत्वाकांक्षी राजकारणी व्यक्तीमुळे कशी अस्थिरतेच्या गर्तेत लोटली जाते यांचं उत्तम उदाहरण आज ब्रिटनमध्ये बघायला मिळतंय. आज जाहीर झालेल्या मध्यावधी निवडणुकांच्या निकालांमुळे ब्रिटीश संसदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. थेरेसा मे यांचा अतिधाडसी निर्णय ब्रिटीश जनतेला अनिश्चिततेच्या नव्या अंधारात लोटणारा ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या आणि सकारात्मक सुरुवातीच्या आशेनं साखर झोपेतल्या लंडनवासियांची सकाळी सकाळी धक्का बसला. थेरेसा मे यांनी मोठ्या उत्साहात जाहीर केलेली मध्यावधी निवडणूक हुजूर पक्षाच्या अंगाशी आलीय. १८ एप्रिल 2017 रोजी पंतप्रधान थेरेसा मे यांनी ब्रिटीश संसदेत मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली. 


प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना आत्मविश्वासानं मैदानात उतललेल्या मे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गुरुवारी ब्रिटीश नागरिकांनी मात्र चांगलाच धक्का दिलाय. डेव्हिड कॅमरुन यांच्या नेतृत्वात ३३१ जागांसह मिळालेलं स्पष्ट बहुमत हुजूर पक्षांनं गामावलंय... आणि साऱ्या देशाला अस्थिरतेच्या नव्या गर्तेत लोटलंय. मध्यावधी निवडणूकीचा जुगार थेरेसा मे खेळल्या त्याचं कारणही जगाला बुचकळ्यात टाकणारं होतं.


मध्यावधीचा जुगार कशासाठी होता?


पुढच्या काही दिवसात ब्रेक्झिटची प्रक्रिया सुरू करायची आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी लागणार आहे. या संपूर्ण काळासाठी सत्तेत एकच सरकार सत्तेत असावं, प्रक्रियेच्या मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली आणि सरकार बदललं तर सगळी प्रक्रिया धोक्यात येईल, अशी थेरेसा मे यांना भीती होती. अडीच - तीन वर्षानंतरची ब्रिटीश जनतेनं ही भीती खरी ठरवली. त्रिशंकू संसद अस्तित्वात आली... पण दोन वर्षांपूर्वीच मिळालेली सोन्यासारखी बहुमताची सत्ता गेल्यानं आता थेरेसा मे यांच्या हुजूर पक्षाच्या सहकाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरलीय. 


खरंतरं ब्रेक्झिटविरोधी असणाऱ्या डेव्हिड कॅमरून यांनी सत्तेच्या चाव्या हाती घेताना थेरेसा मे अत्यंत महत्वाकांक्षी ब्रिटीश पंतप्रधान म्हणून जगासमोर आल्या... त्यानंतरच्या काळात युरोपियन युनियनपासून वेगळं होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ब्रिटीश संसदेच्या मंजुरीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणले गेले. पण त्यांची ही खटपट ब्रिटीश संसदेच्या ६५० सदस्यांना समजावण्यापुरतीचं मर्यादित होती. खासदारांना पटवणं आणि संपूर्ण जनतेला पटवणं यातला फरक करताना थेरेसा मे आणि त्यांच्या हुजुर सहकाऱ्यांची चांगलीच गल्लत झाली. त्यातच ब्रिटनमध्ये गेल्या तीन महिन्यात झालेले दहशतवादी हल्ले हे सुद्धा सत्ताधीशांची ताकद कमी करणारे ठरलेत. एकूणच जनतेचा मूड लक्षात न आल्यानं ब्रेक्झिटनं ग्रासलेल्या ब्रिटीश अर्थव्यवस्थेला आता राजकीय अस्थिरनंही ग्रासलंय हे मात्र नक्की....