मुंबई : यूकेमधलं बोरीस जॉन्सन सरकार कोसळलंय. योगायोग म्हणजे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे सत्तांतर झालं, अगदी तसंच काहीसं सायबाच्या देशात घडलंय. शिवाय एक भारतीय व्यक्ती यूकेचा पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण झालीये. बघुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. (uk political crisis boris johnsons government collapsed)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूकेमध्ये बोरीस जॉन्सन सरकार कोसळलंय. पंतप्रधानांच्या एककल्ली कारभाराला कंटाळून त्यांच्या मंत्रिमंडळातील तब्बल 39 मंत्र्यांनी एकगठ्ठा राजीनामे दिल्यामुळे जॉन्सन यांना राजीनामा द्यावा लागलाय. दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रात घडलेल्या घटनांची सायबाच्या देशात पुनरावृत्ती झालीये.


महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे 39 आमदार नाराज होते. यूकेमध्येही भारतीय वंशाचे मंत्री ऋषी सुनक यांच्यासह बरोबर 39 मंत्र्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त करत राजीनामे दिले. 


शिंदेंचा गट गुवाहाटीत असताना ठाकरेंनी मंत्र्यांची खाती काढून घेत सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला. अगदी अशाच पद्धतीनं जॉन्सन यांनीही राजीनामे दिलेल्या खात्यांवर नवे मंत्री नेमले. 


इकडे मुंबईत राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगितल्यावर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. तर गेल्याच महिन्यात विश्वासदर्शक ठराव जिंकूनही स्वपक्षीय खासदारांच्या नाराजीमुळे जॉन्सन यांना पायउतार व्हावं लागलं. 


यूकेचे पंतप्रधान ठाकरेंच्याच मार्गानं गेल्यानंतर आता लंडनचे 'शिंदे' कोण होणार याची चर्चा सुरू झालीये. यात सुनक यांचं नाव आघाडीवर असल्याचं मानलं जातंय. 


सुनक हे जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री होते. भारतीय वंशाचे सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. संरक्षणमंत्री बेन वॉलेस हेदेखील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. सरप्राईज एलिमेंट म्हणून पेनी मॉरडाँट यांचं नावही पुढे आलंय. त्या विद्यमान सरकारमध्ये कनिष्ठ व्यापारमंत्री आहेत. 


सर्वाधिक खासदार ज्याच्या पाठीशी असणार तोच या सत्तेच्या संघर्षात बाजी मारणार. मात्र त्यासाठी आता सत्ताधारी हुजूर पक्षात रस्सीखेच सुरू झालीये. अद्याप पंतप्रधानपदावर कुणीही दावा केला नसला तरी सुनक यांच्या रुपानं सायबाच्या देशात पहिला भारतीय पंतप्रधान होणार का, याची उत्सुकता आहे.