नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. चीनपासून सुरु झालेला कोरोना आता जगातील 200 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. अनेक बलाढ्य देशही कोरोनाचा सामना करण्यात, कोरोनासमोर हतबल ठरत आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे 24 तासांत 1480 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एकाच दिवसात मृत्यू होण्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 70 हजारांवर पोहचली आहे. तर अमेरिकेत मृतांची संख्या 7406 इतकी झाली आहे. 2 ते 3 एप्रिल दरम्यान एकाच दिवसांत सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका अमेरिकी वृत्तानुसार, न्यूयॉर्कमध्ये गेल्या 27 दिवसांपासून, मागील 24 तासांत सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


अमेरिकानंतर, इटली स्पेनमध्येही कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. इटलीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 19 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 14,681 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


स्पेनमध्येही कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाखांहून अधिकचा आहे.  स्पेनमध्ये आतापर्यंत 11 हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झालाय. 


ब्रिटनमध्ये 24 तासांत कोरोनामुळे 684 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 3605वर गेलाय. ब्रिटनमध्ये 38 हजार 168 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.


जर्मनीत कोरोनाची 90 हजारांहून अधिक प्रकरणं समोर आली आहेत. तर आतापर्यंत 1275 लोकांचा मृत्यू झाला आहे. 


चीनमध्ये कोरोनाचे 90 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. 3326 लोकांचा मृत्यू झाला आहे. 


फ्रान्समध्ये 64 हजारहून अधिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. संपूर्ण फ्रान्समध्ये कोरोनामुळे 6 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. तर 14 हजार लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याची माहिती मिळत आहे.


संपूर्ण जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोच आहे. जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाखांहून अधिकवर गेलाय. तर जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 59 हजारांवर पोहचली आहे.