नवी दिल्ली: जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला पाठिशी घालणाऱ्या चीनला अमेरिकेने जोरदार चपराक लगावली आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीपुढे भारताने मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, चीनने आपल्या नकाराधिकाराचा (व्हेटो) वापर करत हा प्रस्ताव हाणून पाडला होता. या सगळ्या घडामोडींनंतर आता संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन हे देश पुढे सरसावले आहे. मसूद अजहरच्या प्रवासावर निर्बंध घालण्यात यावेत. तसेच त्याची मालमत्ता जप्त करण्यात यावी, असे पत्रकच अमेरिकेकडून जारी करण्यात आले आहे. अमेरिकेच्या या भूमिकेला ब्रिटन आणि फ्रान्स यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. 
 
 एवढेच नव्हे तर अमेरिकेचे माईक पोम्पेओ यांनी इस्लामी जगताविषयीच्या दुटप्पी भूमिकेवरूनही चीनला चांगलेच फटकारले आहे. त्यांनी म्हटले आहे की, चीनच्या झियांग परिसरातील छावण्यांमध्ये लाखो उइगर, पारंपारिक कझाक आणि अन्य अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाच्या लोकांना डांबून ठेवण्यात आले आहे. चीनने या लोकांची तात्काळ सुटका करून त्यांचा छळ थांबवला पाहिजे. मुस्लिम समुदायाविषयीचा चीनचा हा दांभिकपणा जगाला परवडणारा नाही. एकीकडे चीन मायदेशात लाखो मुसलमानांवर अत्याचार करते आणि दुसरीकडे दहशतवादी इस्लामी संघटनांना संरक्षण देते, असा आरोप माईक पोम्पेओ यांनी केला. 





 त्यामुळे आता चीन अमेरिकेच्या आरोपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीन यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार युद्ध सुरु आहे. त्यामध्ये आता या नव्या वादाची भर पडल्याने जागतिक पटलावरील वातावरण तापण्याची शक्यता आहे.