वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाईट हाऊस सोडावं लागलं. मी पुन्हा येईनचा नारा देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर हार मानावी लागली आहे.त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प कुठे राहणार याची उत्सुकता मात्र सर्वांना होती. डोनाल्ड ट्रम्प यांचं आलिशान घर कसं असेल आणि कुठे असेल या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. याचं कारण म्हणजे ट्रम्प यांनी त्यांचा नवा पत्ता ठरवला आहे. डोळे दिपवणारा असा ट्रम्प यांचा नवा महाल आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेचं अध्यक्षपद आणि व्हाईट हाऊस सोडल्यानंतर ट्रम्प कुठे राहणार याची उत्सुकता होती. त्यांनी नवा पत्ता निश्चित केला आहे. ट्रम्प यांच्या फ्लोरिडामधलं मार-ए-लागो असं नव्या घराचं नाव आहे. अटलांटिक समुद्राच्या काठावरचा हा आलिशान बंगला ट्रम्प यांचं विंटर हाऊस म्हणूनही ओळखला जातो. 


काय आहे या महालाचं वैशिष्ट्यं
हा राजवाडा १९२७ मध्ये बांधण्यात आला आहे. तर १९८५ मध्ये डोनल्ड ट्रम्प यांनी १ कोटी डॉलर्सला हा बंगला विकत घेतला होता. आता या घराची किंमत जवळपास १६ कोटी डॉलर्स म्हणजेच साधारण ११६६ कोटी एवढी सांगितली जाते. 
जवळपास २० एकरांवर हा राजवाडा पसरला आहे. यामध्ये १२८ खोल्या आहेत. तब्बल २० हजार चौरस फुटांची बॉलरूम, ५  क्ले टेनिस कोर्ट आणि एक वॉटरफ्रन्ट पूल असा सगळा तामझाम आहे.



ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदावर नसले तरी त्यांना सिक्युरिटी आणि ट्रान्सपोर्ट खर्चासाठी १० लाख डॉलर्स देण्यात येणार आहेत. तर ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांना पाच लाख डॉलर्स देण्यात येतील. ७४ वर्षांचे ट्रम्प आता पुढचं आयुष्य मार-ए-लागोमध्ये ऐषोआरामात घालवणार आहेत.