BBC वरील Income Tax छाप्यासंबंधी पाकिस्तानी पत्रकारानेच विचारला सवाल, उत्तर दिलं अमेरिकेनं...
US on BBC IT Raid: प्राप्तिकर विभागाने ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (BBC) दिल्ली (Delhi) आणि मुंबईमधील (Mumbai) कार्यालयांवर छापे टाकले आहेत. तीन दिवसांपासून ही कारवाई सुरु आहे. दरम्यान यावर अमेरिकेने (USA) प्रतिक्रिया दिली आहे.
US on BBC IT Raid: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी संबंधित ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (BBC) माहितीपटावरुन (Documentary) वाद सुरु असतानाच प्राप्तिकर विभागाने (Income Tax) त्यांच्या कार्यालयांवर छापे (Raid) टाकले आहेत. बीबीसीच्या दिल्ली (Delhi) आणि मुंबई (Mumbai) कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले असून, तीन दिवसांपासून कारवाई सुरु आहे. आर्थिक अनियमिततेच्या आरोपांखाली ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईवरुन विरोधकांनी मोदी सरकारला (Central Government) लक्ष्य केलं असून, संपूर्ण जग याकडे प्रतिशोधातून केलेली कारवाई म्हणून पाहत असून चेष्टेचा विषय झाल्याची टीका केली आहे.
संपूर्ण जगभरातून या कारवाईवर प्रतिक्रिया उमटत असताना अमेरिकेनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत बीबीसीवरील कारवाईसंबंधी प्रश्न विचारला. यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी अमेरिका जगभरात माध्यम स्वातंत्र्याचं समर्थन करत असल्याचं सांगितलं आहे.
अमेरिकेने काय प्रतिक्रिया दिली ?
पाकिस्तानी पत्रकार जहाँजेब अली यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांना विचारलं की "बीबीसीच्या माहितीपटावर बंदी आणल्यानंतर आता भारत सरकार नवी दिल्ली आणि मुंबईमधील कार्यालयांवर छापेमारी करत आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? अमेरिकेला काही चिंता आहे का? कारण वॉशिंग्टनस्थित नॅशनल प्रेस क्लबसह सर्व पत्रकार संघटनांनी हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचं म्हटलं आहे".
यावर उत्तर देताना नेड प्राइस म्हणाले की "मी कालही याचं उत्तर दिलं होतं. मुंबई आणि दिल्लीत बीबीसीच्या कार्यालयांवर झालेल्या छापेमारीची आम्हाला कल्पना आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी तुम्ही भारत सरकारशी संपर्क साधला पाहिजे".
पुढे ते म्हणाले की "या कारवाईसंबंधी अधिक भाष्य करण्याऐवजी आम्ही जगभरात माध्यमांच्या स्वातंत्र्याचं समर्थन करतो हे महत्त्वाचं आहे. आम्ही मानवी हक्क म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्म किंवा श्रद्धा यांचे महत्त्व अधोरेखित करणं कायम ठेवत आहोत. अमेरिका आणि भारत व्यतिरिक्त जगातील सर्व लोकशाही देशांमधील लोकशाही बळकट करण्यात याचा मोठा वाटा आहे".
अमेरिकेने याआधी आपल्याला या कारवाईची कल्पना असून सध्या कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या स्थितीत नसल्याचं म्हटलं होतं. तसंच व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव यांनी व्हाईट हाऊसची यावर सध्या कोणतीही प्रतिक्रिया नसल्याचं सांगितलं होतं.
बीबीसीच्या माहितीपटावरुन वाद
बीबीसीने 2002 गुजरात दंगलीवर आधारित माहितीपट तयार केला आहे. यामध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख केला आहे. दंगलीसाठी मोदी जबाबदार होते असा दावा या माहितीपटात आहे. केंद्र सरकारने या माहितीपटाला विरोध केला असून हा प्रोपगंडा असल्याचं म्हटलं आहे. तसंच हा माहितीपट युट्यूब, ट्विटर सगळीकडून हटवला आहे.