तुर्कीत संसदेबाहेर दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने कसं उडवलं? पाहा LIVE VIDEO
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये रविवारी संसदेजवळ जोरदार स्फोट झाला. दहशतवाद्याने आत्मघाती हल्ला करत स्वत:ला बॉम्बने उडवलं. हा दहशतवादी हल्ला तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये रविवारी संसदेजवळ जोरदार स्फोट झाला. या स्फोटात सहभागी दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने उडवलं. तसंच दुसरा दहशतवादी कारवाईत ठार झाला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. स्फोटानंतर तिथे आगीचे लोळ उठले होते. स्फोट इतका जबरदस्त होता की, कित्येक किमीपर्यंत त्याचा आवाज ऐकू गेला. यादरम्यान संसदेजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा दहशतवादी हल्ला कैद झाला आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी नेमका कशाप्रकारे स्फोट घडवला हे स्पष्ट दिसत आहे.
व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, दोन हल्लेखोर सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास एका कारमधून येतात. यानंतर ते गृह मंत्रालयाच्या जनरल डायरेक्टोरेट ऑफ सेक्युरिटीच्या प्रवेशद्वारासमोर येतात आणि बॉम्बहल्ला करतात अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे. यावेळी एक दहशतवादी कारमधून उतर गेटच्या दिशेने पळत जातो. तर दुसरा दहशतवादी कारजवळ थांबलेला असता. यानंतर काही सेकंदात एक दहशतवादी स्वत:ला बॉम्बने उडवून घेतो. यानंतर तिथे फार आगीचे लोळ आणि धूर दिसतो.
यानंतर दुसऱा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न करताना पोलीस कर्मचारी त्याला ठार करतात. या संपूर्ण घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांची जखम फार गंभीर नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी ज्या ठिकाणाला लक्ष्य केलं आहे तिथे अनेक मंत्रालयं असून संसद आहे. आजच राष्ट्रपती रजब तैयब अर्दोआन यांनी संबोधित केल्यानंतर संसद सत्राला सुरुवात होणार होती असं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्याचा तपास सुर कऱण्यात आला असून, या परिसरातील प्रवेश निषिद्द करण्यात आला आहे. या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसंच आपातकालीन सेवाही ठेवण्यात आली आहे.
तुर्कीत नोव्हेंबर 2022 मध्ये याआधीचा बॉम्बहल्ला झाला होता. शॉपिंग स्ट्रीटवर झालेल्या य हल्ल्यात 6 जण ठार झाले होते, तर 81 जण जखमी झाले होते.