VIDEO : दुसऱ्या महायुद्धातील प्राणघातक बॉम्बचा भीषण स्फोट; 24 किलोमीटर पर्यंत बसले हादरे
World War 2 Bomb Blast : बॉम्ब निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळातच हा स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे तब्बल 24 किलोमीटर पर्यंत बसल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्फोटानंतर हवेत मोठ्या प्रमाणात धूळ पसरली होती
World War 2 Bomb Blast : ब्रिटनच्या (Britain) एका भागात दुसऱ्या महायुद्धातील (World War II) बॉम्ब निष्क्रिय (Diffuse) करताना भीषण स्फोट झाल्याने घबराट पसरली आहे. ब्रिटीश वेबसाइट मेट्रोच्या वृत्तानुसार, बॉम्ब निष्क्रिय होण्यापूर्वी नॉरफोकमधील ग्रेट यार्माउथमध्ये शेकडो लोकांना बाहेर काढण्यात आले होते. बॉम्ब निष्क्रिय करताना झालेला स्फोट एवढा जोरदार होता की त्याचा आवाज अनेक मैलांपर्यंत ऐकू आला. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट झाला तेव्हा 24 किमी दूरपर्यंतच्या इमारतींमध्ये हादरे बसले.
ब्रिटीश प्रशासनाने दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बचा स्फोट केला. ब्रिटनमधील नॉरफोकमध्ये ही घटना घडली आहे. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, बॉम्बस्फोटाची तयारी करण्यात आली नव्हती. तो निष्क्रिय केला जात असताना स्फोट झाला. मात्र या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बॉम्ब निष्क्रिय करत असताना अचानक स्फोट झाला, त्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात धूळ पसरली. कॉन्स्टेबुलरी असिस्टंट चीफ कॉन्स्टेबल निक डेव्हिजन यांनी मेट्रो वेबसाइटला सांगितले की, बॉम्ब निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळातच हा स्फोट झाला.
नॉरफोक पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलने देखील स्फोटाचे फुटेज शेअर केले आहे. मंगळवारी सकाळी दुसऱ्या महायुद्धाचा बॉम्ब सापडल्यानंतर त्या भागात राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या हजारो लोकांना तिथून बाहेर काढण्यात आले होते. बॉम्ब निष्क्रिय करण्यासाठी रोबो तैनात करण्यात आला होता. पण नियोजनाप्रमाणे झाले नाही आणि स्फोट झाला.
दरम्यान, पुलाच्या बांधकामादरम्यान तीन फूट लांबीचा बॉम्ब अधिकाऱ्यांना आढळून आला होता. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी या परिसराचा ताबा घेतला होता. यानंतर लगेचच 200 ते 400 मीटरच्या परिघात राहणाऱ्या लोकांना परिसर रिकामा करण्याचा सल्ला देण्यात आला होता.