श्रीलंकेत हिंसक जमावाचा राष्ट्रपती भवनाला वेढा, गोटबाया राजपक्षे यांनी काढला पळ
श्रीलंका सध्य़ा आर्थिक संकटात आहे. लोकांचा जनजीवन विस्कळीत झाले असून महागाईचा मोठा फटका त्यांना बसत आहे.
Sri lanka crisis : श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे त्रस्त झालेल्या आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर कब्जा केला, त्यानंतर राष्ट्रपती राजपक्षे यांनी त्यांच्या निवासस्थानातून पळ काढला. राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांच्या पलायनाचा दावा केला जात आहे. त्याचवेळी आंदोलकांनी खासदार रजिता सेनारत्ने यांच्या घरावरही हल्ला केला आहे.
याआधी 11 मे रोजी तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे संपूर्ण कुटुंबासह पळून गेले होते. संतप्त जमावाने राजपक्षे यांच्या कोलंबो येथील शासकीय निवासस्थानाला वेढा घातला.
दुसरीकडे, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि जलद तोडगा काढण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी संसदेचे अधिवेशन बोलावण्याचे आवाहन सभापतींना केले आहे. एका पत्रात, SLPP च्या 16 खासदारांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना तात्काळ राजीनामा देण्याची विनंती केली आहे.
कोलंबोतील राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाला दुपारी आंदोलकांनी घेराव घातला. यानंतर आंदोलकांनी राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानाचीही तोडफोड करून निवासस्थान ताब्यात घेतले. श्रीलंकेतील ढासळत चाललेल्या आर्थिक संकटादरम्यान, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज रॅली निघाली आहे.
दुसरीकडे, रॅलीदरम्यान श्रीलंकन पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. या हिंसक चकमकीत 100 हून अधिक आंदोलक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना कोलंबोच्या नॅशनल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
श्रीलंकेत शुक्रवारी अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. लष्करालाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.