कधीकाळी वेस्टर्न लाईफस्टाईल जगणाऱ्या अफगाणी महिला आज शिक्षणापासूनही दूर
का आणि कधीपासून आली त्यांच्यावर ही वेळ?
काबूल : ( Kabul) अफगाणिस्तानात सत्तासंघर्ष विकोपाला गेलेला असतानाच तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित होणं जगाला हादरवणारं ठरलं. तालिबानची सत्ता येताच त्याचे देशातील महिलांवर काय परिणाम होणार, याचीच चिंता सर्व स्तरांतून व्यक्त केली गेली. महिलांच्या आयुष्यापुढे असणारं हे अंधकाराचं पर्व पाहूनच अनेकांना धडकीही भरली. या साऱ्यामध्येच अफगाणिस्तानाचं (Afghanistan) एक वेगळं रुप सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलं. (Afghanistan women old photos)
अनेक सोशल मीडिया हँडलवरून हे फोटो शेअर करण्यात आले. जिथं अफगाणिस्तानमधील महिला बुरखा नव्हे तर पाश्चिमात्य पेहरावामध्ये अर्थाच वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहेत.
अनेक वर्षे अंतर्गत संघर्ष आणि परदेशी हस्तक्षेपानं प्रभावित अफगाणिस्ताननं 20 व्या दशकाच्या मध्यापर्यंत आधुनिकीकरणाची कास पकडली. 1950-60 च्या दरम्यान महिलांच्या जीवनशैलीमध्ये पाश्चिमात्य संस्कृतीची छाप दिसू लागली होती. त्यावेळी अफगाणिस्तान सरकारनं मुलींसाठी शाळा, विद्यापीठं यांसाठी निधी देऊ केला. संविधानात अफगाणी महिलांना मतदानाचा हक्कही देण्यात आला. शहरी भागांमध्ये मुली महाविद्यालयांमध्ये आणि नोकरीसाठी निर्धास्तपणे जाताना दिसल्या. काहींनी तर सक्रिय राजकारणातही प्रवेश केला होता.
अफगाणिस्तानमध्ये एक काळ असाही आला होता, जेव्हा बुरखा वापरणं पर्यायी होतं.हा देश एका उदारमतवादी मार्गानं आणि समृद्ध समाज निर्माण करण्याच्या उद्देशानं वाटचाल करु पाहत होता. 1970 च्या उत्तरार्धात ज्यावेळी पाश्चिमात्य देशांमध्ये महिला आंदोलनांनी जोर धरला तेव्हा अफगाणी महिलांच्या प्रगतीच्या वाटा खुंटल्या.
तालिबानची क्रूरता
1996 पासून 2001 पर्यंत अफगाणिस्तानात तालिबानची (Taliban) सत्ता असताना शरीयत इस्लामी कायद्याची सक्तीची व्याख्या सर्वांसमोर आली. ज्यामध्ये महिलांच्या संचारावरच बंदी आणली गेली. शाळा, महाविद्यालयं, नोकरीसाठी महिलांच्या वाटा बंद झाल्या. घरातून बाहेर निघण्यापूर्वी महिलांना चेहरा झाकणं बंधनकारक ठरलं, बाहेर पडतेवेळी सोबत एक पुरुष नातेवाईक असणं आवश्यक होतं. या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना क्रूर शिक्षांचा सामना करावा लागत होता. अफगाणिस्तानमध्ये हे बदललेलं चित्र पाहताना परिस्थितीची झळ तेथील महिलांच्या आयुष्यावर कसे परिणाम करुन गेली याचं विदारक चित्र समोर ठेवत आहे.