Video : मोसमातील पहिल्या बर्फवृष्टीनंतर डिस्नेलँडमध्ये अवतरलं परिकथेतील खरंखुरं गाव; इथं पोहोचायचा खर्च किती माहितीये?
Disneyland Paris Snowfall Video : डिस्नेलँडमध्ये होणारी बर्फवृष्टी पाहून तुम्हाला बसल्या जागीच जाणवेल तेथील हुडहुडी. पाहताच म्हणाल `चला जाऊ मिकी माऊस, मिनी आणि पऱ्यांच्या देशा...
Disneyland Paris Snowfall Video : हिवाळा हा ऋतू अनेकांच्याच आवडीचा. निसर्गाचं 360 अंशांनी वेगळं दिसणारं रुप या ऋतूमध्ये पाहायला मिळतं. अशा या ऋतूची सध्या सुरूवात झाली असून, त्याची खरी मजा कुठे येतेय माहितीये? एकिकडे इथं भारतात काश्मीर हिमवर्षावानं अच्छादलेलं असतानाच अनेकांसाठी कुतूहलाचा विषय असणारं डिस्नेलँड, अर्थात कैक कार्टून पात्रांचं जणू घरच... असं हे ठिकाणही बर्फाच्या चादरीमुळं सुरेख रुपात सर्वांसमोर आलं आहे.
एका परिकथेत एक राज्य असतं, एक महाल असतो, मोठाले वृक्ष असतात अशी गोष्ट बालपाणापासून आतापर्यंत अनेकांनीच एकदातरी ऐकली असेल. कल्पनांच्या विश्वात भान हरपून टाकणाऱ्या या परिकथा प्रत्यक्षात अनुभवण्यासाठीची काही ठिकाणंही या जगात असून, सध्या याच अनोख्या विश्वातील एका खास ठिकाणावर मोसमातील पहिली बर्फवृष्टी झालीय. ते ठिकाण म्हणजे डिस्नेलँड पॅरिस.
बुधवार आणि गुरुवारी डिस्नेलँड पॅरिस इथं वातावरण असं काही बदललं की, सर्वत्र बर्फाचीच चादर पाहायला मिळाली. आकाशातून जमिनीच्या दिशेनं येणारा, झाडांच्या फांद्यांमध्ये, महालाच्या कमानींमध्ये अडकणारा भुरभुरणारा बर्फ इथं येणाऱ्या प्रत्येकालाच थक्क करून गेला. डिस्नेलँडमधील स्लीपिंग ब्युटी कॅसल तर, या बर्फवृष्टीमुळं एका वेगळ्याच विश्वात आल्याची अनुभूती सध्या तिथं येणाऱ्या पर्यटकांना देत आहे.
महिन्याभरात आलेला नाताळ अर्थात ख्रिसमस (Christmans 2024) आणि त्यासाठी करण्यात आलेली विशेष सजावट या डिस्नेलँडची शोभा वाढवतानाच तिथं झालेल्या बर्फवृष्टीमुळं इथला परिसर खुलून निघाला आहे. डिस्नेपार्कसह अनेक नेटकऱ्यांनी आणि तिथं भेट देण्यासाठी पोहोचलेल्या पर्यटकांनीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून मिकी, मिनी आणि असंख्य कार्टून पात्रांचा आशियाना असणाऱ्या या डिस्नेलँडचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.
हेसुद्धा वाचा : नजर जाईल तिथं बर्फच फर्फ... PHOTOS पाहून म्हणाल 'जन्नतों के दरमियां ये कश्मीर है...'
डिस्नेलँडमध्ये झालेल्या या हिमवृष्टीमुळं येथील सौंदर्यात भर पडली असली तरीही इथं येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेवर येथील प्रशासन अधिक भर देताना दिसत आहे. येथील पायवाटांवर साठलेला बर्फ बाजूला करण्यापासून पर्यटकाच्या खाण्यापिण्याची तजवीज करेपर्यंतची काळजी डिस्नेलँडचे कर्मचारी घेत आहेत.
डिस्नेलँड पॅरिसला पोहोचायला खर्च तरी किती?
राहिला प्रश्न डिस्नेलँडला पोहोचण्यापासून तिथं फिरण्यापर्यंतच्या एकूण खर्चाचा, तर अनेक टूरिस्ट ऑपरेटर कंपन्या यासाठीच्या पॅकेज टूर सादर करतात. ज्यामध्ये प्रवास वगळता स्थानिक ठिकाणांना भेट देण्यापासून ब्रेकफास्ट आणि डिनर अर्थात रात्रीच्या जेवणाची यात सोय असते. डिस्नेलँडमध्ये येऊन इथं भटकंती करत अद्भूत विश्वात रमण्यासाठी संभाव्य खर्च खालीलप्रमाणे...
दोन प्रौढ आणि एक लहान मुल- $13,317 म्हणजेच 11,25,242.72 रुपये
दोन प्रौढ आणि दोन लहान मुलं - $16,505 म्हणजेच 13,94,634.73 रुपये
दोन प्रौढ आणि तीन लहान मुलं- $22,955 म्हणजेच 19,39,622.03 रुपये
(खर्चाची रक्कम स्थानिक गोष्टींचे बदलते दर आणि चलनामध्ये होणाऱ्या चढउतारांवर आधारित आहे.)