Viral Video: सोशल मीडिया म्हटलं की तिथे रोज नवे, अतरंगी व्हिडीओ शेअर होत असतात. यातील प्रत्येक व्हिडीओच्या मागे तो व्हायरल व्हावा हाच हेतू असतो. त्यातील काही व्हिडीओ प्रेरणादायी असल्याने तर काही वादग्रस्त असल्याने चर्चेत येतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे जो पाहिल्यानंतर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. व्हायरल झालेल्या टिकटॉक व्हिडीओत एक बाप आपल्या तीन महिन्याच्या बाळाचा गाडीवरील बर्फ पुसण्यासाठी झाडूप्रमाणे वापर करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी संतापले आहेत. पोलिसांनीही या व्हिडीओचा तपास सुरु केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोर्ट आर्थर येथे हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टेक्सास पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हा टिकटॉक व्हिडीओ @heaven_is_psyco या अकाऊंटवर शेअर करण्यात आला होता, जो आता काढून टाकण्यात आला आहे. व्हिडीओत व्यक्ती वारंवार मुलाला गाडीवर साचलेल्या बर्फात फिरवताना दिसत आहे. 


व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. यातील एकाने पालक काही क्लिकसाठी मुलांसह काय करु शकतात हे घृणास्पद आहे अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी, तो बाप होण्याच्या लायकीचा नाही असं म्हटलं आहे. 



दरम्यान, स्थानिक टीव्ही स्टेशन KFDM शी बोलताना, शहरातील एका वकिलाने सांगितलं की, व्हिडिओ पाहून संताप झाल्याने त्यांनी पोलिसांना फोन केला. द इंडिपेंडेंटमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, पोर्ट आर्थर पोलिस प्रमुख टिम डुरिसो यांनी आउटलेटला सांगितले की हे प्रकरण एका पेट्रोलिंग लेफ्टनंट आणि एका गुप्तहेरकडे सोपवण्यात आलं आहे.


अपार्टमेंटमध्ये वेलफेअर चेक केल्यानंतर, संबंधित विभागाने व्हिडिओमधील व्यक्तीशी संपर्क साधला. त्याच्याविरुद्ध बाल धोक्याचा आरोप दाखल करायचा आहे. त्यांनी असेही म्हटले की अशा प्रकरणांमध्ये बाल संरक्षण सेवांना सहभागी करून घेणे ही एक मानक प्रक्रिया आहे.


"ही एक दुःखद परिस्थिती आहे. मला माहित आहे की बरेच लोक सोशल मीडियावर जातात आणि ते क्लिक शोधत असतात. पण तुम्ही बाळाला अशाप्रकारे विंडशील्डवर ठेवू शकत नाही," असं द इंडिपेंडेंटने केबीएमटीचा हवाला देत सांगितलं. दरम्यान घटनेनंतर बाळ सुरक्षित असल्याचं समजत आहे.