अमेरिकेत ज्वालामुखीचा उद्रेक, 1700 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं
किलाएवा ज्वालामुखी स्फोटात 21 घरं उद्ध्वस्त झालीत
पहोवा : अमेरिकेतल्या हवाई बेटांवर ज्वालामुखीचा उद्रेक सुरूच आहे. ज्वालामुखीतून निघणारा लावा रहिवासी भागांमध्ये पसरत चाललाय... रस्त्यांवर लावा पसरतोय... आत्तापर्यंत या ज्वालामुखीनं रस्त्यावरची अनेक वाहनं अक्षरशः गिळून टाकलीत. आत्तापर्यंत २६ घरंही ज्वालामुखीच्या भक्ष्यस्थानी पडलीत... या भागातल्या हजारो लोकांनी स्थलांतर केलंय. वीस किलोमीटर अंतरावर हा ज्वालामुखी पसरलाय... आतापर्यंत दहा हजार लोकांना या ज्वालामुखीचा फटका बसलाय.
किलाएवा ज्वालामुखी स्फोटात 21 घरं उद्ध्वस्त झालीत. तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, हा स्फोट इतका भीषण आहे की हा लावा हवेत 61 मीटर (200 फूट) उंचपर्यंत उडाला. ज्वालामुखीच्या उद्रेकाअगोदरच खबरदारीचा उपाय म्हणून 1700 हून अधिक लोकांना घटनास्थळावरून हलवण्यात आलं होतं. या सगळ्यांचं आता पुन्हा आपल्या घरी लवकर परतणं अशक्यच दिसतंय.
हवाई अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्ध्वस्त झालेले घर लीलानी एस्टेट उपखंडात आहेत... इथं ज्वालामुखीच्या उद्रेकानं ठिकठिकाणी जमीन फाटलीय... यातून उकळता लावा जमिनीवर पसरलाय... आणि त्यातून गॅस- धूर बाहेर पडतोय.
उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेत काही दिवसांपूर्वी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. जगातील सर्वात सक्रीय ज्वालामुखी किलाउएच्या उद्रेकानंतर देशात जवळपास 205 भूकंपाचे धक्के बसलेत.