No Smoking:प्रत्येक सिगारेटवर असेल इशारा देणारा संदेश, आरोग्यमंत्री म्हणाले, `लोकं तंबाखूच्या...`
जगात धूम्रपान करणाऱ्या लोकांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. जगात एकूण धूम्रपान करणाऱ्या लोकांपैखी तब्बल 12 टक्के लोकं भारतात राहतात.
Cigarette Smoking Is Injurious To Health: जगात धूम्रपान करणाऱ्या लोकांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. जगात एकूण धूम्रपान करणाऱ्या लोकांपैखी तब्बल 12 टक्के लोकं भारतात राहतात. धूम्रपानामुळे अतिशय गंभीर प्रकारचे आजार होतात. धूम्रपानामुळे पुरुषांचं आयुष्य तब्बल 12 वर्षे आणि महिलांचं आयुष्य तब्बल 11 वर्षांनी कमी होतं. धूम्रपान करणं आरोग्यासाठी घातक असूनही लोकं धूम्रपान करणं सोडत नाही. सिगारेटच्या पाकिटावर सूचना लिहिली असते. पण एकदा का सिगारेट पेटवली की, सर्व सूचना धुरात उडून जातात. मात्र आता प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक इशारा लिहिला जाणार आहे. असं करणारा कॅनडा हा जगातील पहिला देश असणार आहे. दोन दशकांपूर्वी कॅनडाने तंबाखू उत्पादनांच्या पॅकेजिंगवर ग्राफिक फोटो आणि चेतावणी संदेश लिहिण्यास सुरुवात केली होती. यानंतर जगातील अनेक देशांमध्ये केले गेले.
पॅकेटवर लिहिलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष
कॅनडाच्या मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती मंत्री, कॅरोलिन बेनेट म्हणाल्या की, "लोकं तंबाखू उत्पादनांच्या पॅकेटवरील इशाऱ्यांकडे लक्ष देत नाहीत. या संदेशाचा प्रभाव कमी झाला असून याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. प्रत्येक तंबाखू उत्पादनांवर आरोग्यविषयक इशारा दिल्यास आवश्यक संदेश लोकांपर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर जे लोक पहिल्यांदा सिगारेट ओढत आहेत. त्यांनाही तंबाखूजन्य पदार्थांची तीव्रता कळेल."
नवीन नियम 2023 च्या उत्तरार्धात लागू केला जाईल
कॅरोलिन बेनेट यांनी सांगितले की, 2023 च्या उत्तरार्धात या नवीन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. याअंतर्गत आम्ही प्रत्येक सिगारेटवर ‘प्रत्येक पफमध्ये विष’ असा संदेश लिहणार आहोत. या प्रस्तावाचे स्वागत करताना, कॅनडा हार्ट अँड स्ट्रोक फाउंडेशनचे सीईओ डग रॉथ म्हणाले की, "कॅनडामध्ये आता सिगारेटसाठी जगातील सर्वात मजबूत आरोग्य सूचना प्रणाली असेल. ही घातक उत्पादने आहेत आणि या उपाययोजनांमुळे धूम्रपान कमी होण्यास मदत होईल."
कॅनेडियन कॅन्सर सोसायटीचे वरिष्ठ धोरण विश्लेषक रॉब कनिंगहॅम म्हणाले की, "हे जगभर एक उदाहरण प्रस्थापित करणार आहे. ही एक चेतावणी असेल ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. हे प्रत्येक धूम्रपान करणाऱ्यापर्यंत पोहोचेल. " धूम्रपानामुळे हृदयविकार, कर्करोग, त्वचेचे आजार होतात. त्याचबरोबर प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो.