VIDEO : प्रिन्स हॅरी- मेगनच्या मुलासाठी मुंबईच्या डबेवाल्यांनी पाठवली खास भेट
आर्चीसाठी डबेवाले आजोबा म्हणतात, मारुतीराया शक्ती दे.....
मुंबई : काही दिवसांपूर्वीच ब्रिटनच्या राजघराण्यात एका चिमुकल्याचं आगमन झालं. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या आयुष्यात आर्ची नावाचा राजकुमार आला आणि बस्स या शाही कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. संपूर्ण ब्रिटन आणि जगभरात या आनंदवार्तेचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वत्र या राजघराण्याला शुभेच्छा देण्याचं सत्र सुरू आहे. भारतीय मंडळी आणि मुख्यत्वे मुंबईचे डबेवालेही यापासून दूर नाहीत.
ब्रिटनच्या राजघराण्याशी असणारं डबेवाल्यांचं नातं अगदी खास. किंबहुना प्रिन्स हॅरी आणि मेगनच्या लग्नाच्या वेळीसुद्धा त्यांनी आशीर्वाद आणि सदिच्छांचं प्रतिक म्हणून या जोडीसाठी खास भेट पाठवली होती. त्याचप्रमाणे आता त्यांच्या मुलासाठीसुद्धा डबेवाल्यांनी खास भेट पाठवली आहे. त्यामुळे आर्ची हॅरिसन माऊंटबेटन विंडसर याच्यासाठी थेट सातासमुद्रापारहून खास भेट येत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
आर्चीसाठी पाठवण्यात येणाऱ्या भेटवस्तूंविषयीची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. ज्यामध्ये नवजात बाळाला घालता येणारी काही आभूषणं म्हणजेच पायातील वाळे, कंबरेतील साखळी, गळ्यातील गोफ अशा भेटवस्तू देण्यात येणार असल्याचं माध्यामांना सांगण्यात आलं. अगदी मराठमोळ्या पद्धतीची भेटवस्तू आर्चीला देण्यात येणार असून, गळ्यातील गोफामध्ये मारुतीराया म्हणजेच हनुमान देवतेची प्रतिमाही असणार आहे.
हनुमान हे चातुर्य आणि शक्तीचं प्रतिक आहे. त्यामुळे आर्चीसुद्धा असाच व्हावा या उद्देशाने त्यांनी मारुतीरायाचाच आशीर्वाद आर्चीसाठी पाठवला आहे. प्रिन्स हॅरी यांचे वडील, प्रिन्स चार्ल्स हे मुंबईच्या डबेवाल्यांचे फार चांगले मित्र आहेत. त्यामुळे ते आजोबा झाल्याचा आम्हालाही आनंद आहे, असं म्हणत डबेवाल्यांनी आनंद व्यक्त केला. मुंबईकरांची भूक भागवणाऱ्या या डबेवाल्यांकडून उचलण्यात आलेलं हे पाऊल आणि ब्रिटनच्या राजघराण्याप्रती असणारी त्यांची आत्मियता यांचीच चर्चा सध्या होत आहे.