पॅरिस : फ्रान्स हा उत्सवी लोकांचा देश... त्यामुळं इथं उत्सवांची काही कमी नाही. सीते शहर हे फ्रान्सचं व्हेनिस म्हणून ओळखलं जातं. शहरांतर्गत अनेक कालवे आहेत. या कालव्यांमध्ये उन्हाळ्यात एक अनोखी स्पर्धा भरवली जाते. ही स्पर्धा असते ढाल-भाल्याच्या युद्धाची... 'वॉटर जोयुस्टोईंग' असं या स्पर्धेचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर ही स्पर्धा दोन संघांमध्ये खेळवली जाते. दोन्ही संघ आपापल्या बोटींमध्ये बसतात. सर्व खेळाडूंनी पांढऱ्या रंगाचे खलाशांचे कपडे परिधान केलेले असतात. बोटीच्या शेपटाचा भाग लांब आणि निमुळता झालेला असतो.


बोटीत वल्हवणारे खेळाडू असतात तर शेपटीकडच्या भागात एक योद्धा उभा असतो. त्याच्या हातात लाकडाचा भाला आणि ढाल असते. दोन्ही बोटी जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा योद्धा आपल्या हातातल्या भाल्यानं समोरच्या योद्ध्यावर प्रहार करतो. प्रतिस्पर्ध्याला जो पाण्यात पाडतो तो विजयी होतो. 



कधी कधी एकमेकांना पाण्यात पाडण्याच्या प्रयत्नात दोन्ही योद्धे पाण्यात पडतात. जिंकल्यावरचा योद्ध्यांचा जल्लोष पाहण्यासारखा असतो. स्पर्धेदरम्यान इथलं वातावरण भारलेलं असतं.


फ्रान्समध्ये साधारणत: ऑगस्टमध्ये उन्हाळा असतो. उन्हाळ्यात या स्पर्धा भरवल्या जातात. १६६६ पासून या स्पर्धा होत असल्याची नोंद आहे. वॉटर जस्टो पाहण्यासाठी कालव्याच्या दुतर्फा लोकांची झुंबड उडालेली असते. स्पर्धकांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी बँड पथकं आलेली असतात. ही स्पर्धा म्हणजे मौज मस्ती आणि धम्माल असते.