Shehbaz Sharif : `भारताविरोधात तीन युद्ध लढल्याने...`; मोदींचा उल्लेख करत पाकिस्तानी PM चं मोठं विधान
Shehbaz Sharif on India-Pakistan: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी `अल अरबिया`ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करताना दोन महत्त्वाची विधानं केली आहेत.
Pakistan PM Shehbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी, "भारतीय नेतृत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) मला सांगायचं आहे की आपण एकत्र बसूयात आणि काश्मीरसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर उत्तर शोधण्यासाठी गांभीर्याने आणि प्रामाणिक प्रयत्न करावेत," असं म्हटलं आहे. भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) शेजारी देश असून त्यांना एकमेकांबरोबर रहायचं आहे असंही शरीफ यांनी म्हटलंय.
मोदींना हेच सांगायचं आहे
'अल अरबिया' या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शरीफ यांनी हे विधान केलं आहे. "आपण शांततेत रहावं आणि प्रगती करावी की एकमेकांशी वाद घालून वेळ आणि स्त्रोत खर्च करावं हे आपल्यावर आहे. भारताविरुद्ध आम्ही तीन युद्ध लढली. यामुळे लोकांना अधिक दु:ख, गरीबी आणि बेरोजगारी परसरली. आम्ही यामधून धडा घेतला असून आम्हाला आता शांततेत रहायचं आहे. या माध्यमातून आम्ही आमच्या मूळ समस्या सोडवण्यासाठी अधिक सक्षम होऊ असं आम्हाला वाटतं. हेच मला पंतप्रधान मोदींना सांगायचं आहे," असं शरीफ म्हणाले.
आमची इच्छा आहे की...
पाकिस्तानी पंतप्रधानांनी, "आम्हाला गरीबीवर मात करायची आहे. समृद्धि प्राप्त करण्याची आमची इच्छा आहे. आमच्या लोकांना शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगार उपलब्ध करुन देण्याची आमची इच्छा आहे. दारुगोळा, बॉम्ब यासारख्या गोष्टींवर खर्च करण्याची आमची इच्छा नाही. हेच मला पंतप्रधान मोदींना सांगायचं आहे," असंही म्हटलं. तसेच "आपण अण्वसस्त्र असणारे देश आहोत. युद्ध झालं तर काय झालं हे सांगायला कोणी उरेल की नाही हे सांगणंही कठीण आहे," अशी भीतीही शरीफ यांनी व्यक्त केली.
भारताला डिवचलं
एकीकडे युद्ध नको असं सांगतानाच शरीफ यांनी भारताला डिवचलंही आहे. भारतामध्ये अल्पसंख्यांकांना त्रास दिला जातो असं ते म्हणाले आहेत. "हे सगळं थांबलं पाहिजे. ज्यामुळे जगभरामध्ये संदेश जाईल की भारत चर्चेसाठी तयार आहे," असं शरीफ यांनी म्हटलं. तर काश्मीर मुद्द्यावर बोलताना शरीफ यांनी, "काश्मीरमध्ये दिवसोंदिवस मानवाधिकारांचं उल्लंघन होत आहे. भारताने भारतीय संविधानातील कलम 370 अंतर्गत काश्मिरी लोकांना देण्यात आलेली स्वायत्तता काढून घेतली आहे," असा आरोपही शरीफ यांनी केला आहे.