स्पेन : एखाद्या जोडप्याच्या घटस्फोटानंतर मुलाची कस्टडी कोणाकडे द्यायची याबाबत प्रश्न निर्माण होतो. मात्र घटस्फोटानंतर पाळीव प्राण्याची कस्टडी कोणाकडे येणार याबाबत कधी विचार केलाय. मात्र हा विचार स्पेन या देशाने केला आहे. इतकंत नाही तर स्पेनने यासंदर्भात नीट विचार करून कायदा देखील केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पेनमध्ये, 5 जानेवारीपासून लागू झालेल्या नवीन कायद्यात प्रथमच पाळीव प्राण्यांना केवळ वस्तू नव्हे तर 'जिवंत आणि संवेदनशील प्राणी' म्हणून मान्यता देण्यात आली आहे. हा कायदा अंमलात आल्याने घटस्फोटामध्ये कुत्रा, मांजर, ग्लोडन फिश, कासव किंवा पक्षी यांची काळजी कोण घेणार हे ठरवताना कोर्टाला आता प्राण्यांच्या हिताचा विचार करावा लागणार आहे. 


स्पेनने तयार केलेल्या या कायद्यात पाळीव प्राणी देखील कुटुंबातील सदस्य असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. आता फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि पोर्तुगाल यांच्याप्रमाणे प्राण्यांना संवेदनशील प्राणी म्हणून ओळखणारा स्पेन हा नवा युरोपीय देश बनला आहे. पाळीव प्राणी पाळणाऱ्या जोडप्यांमध्ये अनेकदा उद्भवणारी कायदेशीर भांडणं मिटवणं हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.


स्पेनने नवा तयार केलेला कायदा म्हणतो, मालकांनी पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेची 'हमी' दिली पाहिजे. जर जोडप्यामधील एका व्यक्तीचा पाळीव प्राण्यावर क्रूरतेचा इतिहास असेल, तर त्याला प्राण्यांचा ताबा नाकारला जाऊ शकतो. 


स्पेनच्या नागरी संहितेत सुधारणा करणारा हा कायदा म्हणतो की, कोर्टाने पाळीव प्राण्यांच्या ताब्यात घेण्याच्या प्रकरणांवर निर्णय देताना त्यांच्या सुरक्षेचा आणि कल्याणाचा देखील विचार केला पाहिजे.