Mask Mandatory : आता मास्क वापराच! कोरोनाच्या धोक्यामुळं WHO चा इशारा
Corona Mask Mandetory : किती तो मास्क वापरायचा... असं म्हणत तुम्हीही हा मास्क एखाद्या कोपऱ्यात फेकला असेल तर आताच सतर्क व्हा. कारण, जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा मास्क वापरण्याचा इशारा दिला आहे.
Corona Mask Mandetory : जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना (Corona) डोकं वर काढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भारतातही या विषाणूचे रुग्ण वाढत असल्याची बाब निदर्शनात आली आणि आरोग्य यंत्रणेनं सावधगिरीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली. सध्या भारतात परिस्थिती हाताबाहेर गेलेली नसली, तरीही जगातील इतर राष्ट्रांमध्ये कोरोनाच्या XBB.1.5 या सबव्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अमेरिकेमध्ये या व्हॅरिएंटनं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्यामुळं आता जागतिक आरोग्य संघटनासुद्धा चिंतेत आली आहे.
WHO नं सर्वच देशांना दिलेल्या निर्देशांनुसार ज्या देशांमध्ये कोरोनानं हाहाकार माजवण्यास पुन्हा सुरुलवात केली आहे त्या देशांमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मास्कचा वापर बंधनकारक असेल. सध्या प्राथमिक स्वरुपात प्रवाशांना हा इशारा देण्यात येत असून, हा नियम आता सर्वच उड्डाणांसाठी लागू होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल.
हेसुद्धा वाचा : Winter Care: हिवाळा वाढलाय त्वचा अजिबात कोरडी होऊ देऊ नका...वापरा या टिप्स
WHO च्या कॅथरीन स्मॉलवूड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'लांबचा प्रवास आणि अती धोकादायक ठिकाणांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मास्क वापरण्याचा सल्ला तातडीनं देण्यात यावा. शिवाय या प्रवाशांकडे चाचणीचा निगेटीव्ह अहवाल असणंही गरजेचं आहे.' सदरील नियम आता किती देशांकडून लागू केले जाणार हाच महत्त्वाचा प्रश्न उभा राहत आहे.
अमेरिकेत कोरोनाच्या XBB.1.5 व्हेरिएंटचे अनेक रुग्ण
जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार ऑमायक्रॉनचा XBB.1.5 हा व्हेरिएंट मोठ्या वेगानं पसरत असून, रविवारपर्यंत अमेरिकेतील (America) 27.6 टक्के संसर्गवाढीसाठी तोच जबाबदार आहे. इतकंच नव्हे, तर सध्या अनेक युरोपिय राष्ट्रांमध्येसुद्धा या सबव्हेरिएंटच्या संसर्गाचे रुग्ण आढळू लागले आहेत.
भारताला मोठा दिलासा
संपूर्ण जगभरात कोरोनाच्या संकटानं चिंता वाढवलेली असतानाच भारतात मात्र या विषाणूच्या जीवघेण्या संसर्गाचा धोका कमी असल्याचं स्पष्ट होत आहे. कोविड वर्किंग ग्रुपच्या अध्यक्षांकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. त्यामुळं तूर्तास भारतासाठी हा मोठा दिलासा आहे. असं असलं तरीही सध्या नियमांमध्ये आलेल्या शिथिलतेमुळं परदेशातून मोठ्या प्रमाणात नागरिक देशात येत आहे. विमानतळावर त्यांची (Covid test) कोविड चाचणीही होत आहे. पण, तरीही आपण सर्वांनीच कोरोनाविषयीच्या नियमांचा विसर न पडू दिलेलाच बरा.