Why 4pm To 6pm Is Now A Dead Zone At US Offices: कोरोनाच्या लाटेपासून कॉर्परेट क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. खास करुन मागील 3 वर्षांमध्ये कामाच्या शैलीमध्ये बराच फरक पडला आहे. वर्किंग अवर्स म्हणजेच कामाच्या तासांदरम्यान लवचिकता असो किंवा हायब्रिड मॉडेल असो कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना बऱ्याच सवलती कोरोना काळात दिल्या. वर्क फ्रॉम होमचा वाढता ट्रेण्ड याच कोरोना काळातील आहे. अनेक कंपन्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत हे न्यू वर्क कल्चर अगदी सहज स्वीकारलं. मात्र अमेरिकेमध्ये आता आणखीन एक नवाच ट्रेण्ड सुरु झाला आहे. या ट्रेण्डचं नाव आहे 'ब्रेक टाइम.' या ट्रेण्डमुळे कामाचे पिक अवर्स म्हणजेच कर्मचारी सर्वाधिक व्यस्त असल्याचा कालावधीही बदलला आहे.


या 2 तासात करतात काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील या नव्या ट्रेण्डप्रमाणे सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंतचा कालावधी 'डेड झोन' म्हणून ओळखला जातो. या कालावधीमध्ये अनेक कर्मचारी त्यांचं काम थांबवतात. त्यानंतर ते सायंकाळी पुन्हा कामाला बसतात आणि आपलं दिवसाचं काम संपवतात, अशी माहिती एका मॅनेजरने 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिली आहे. या दुपारच्या 2 तासांच्या वेळेत हे कर्मचारी त्यांच्या आवडीची कामं करतात किंवा हा वेळ त्यांच्या आवडीनुसार घालवतात. आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवणे, गोल्फ खेळणे यासारख्या गोष्टींसाठी कर्मचारी हा वेळ वापरतात. या नव्या ट्रेण्डला 'ट्रीपल-पिक' असं नाव देण्यात आलं आहे. या माध्यमातून लोकांना त्यांच्या कामाचे तास आणि खासगी आयुष्यातील वेळ अधिक परिणामकारकपणे वापरता यावा असा हेतू आहे.


यामागील लॉजिक काय?


'ट्रीपल-पिक'संदर्भात मायक्रोसॉफ्टच्या संधोशकांनी अभ्यास केलेला. मुळात या गोष्टीला 'ट्रीपल-पिक' म्हणण्यामागील कारण म्हणजे दिवसातून 3 वेळा अशा असतात जेव्हा कर्मचारी सर्वाधिक उत्साही असतात आणि कामात त्यांचा हा उत्साह दिसून येतो या काळात प्रोडक्टीव्हीटी अधिक असते. यापैकी पहिला वेळ हा 11 वाजताचा असतो, दुसरा अडीच ते 3 वाजण्याच्या सुमारस आणि तिसरा स्लॉट हा रात्री 10 च्या सुमारास असतो असं मायक्रोसॉफ्टचं म्हणणं आहे. किबोर्डच्या वापराच्या आधारे ही माहिती गोळा करण्यात आली आहे.


चांगले आणि वाईट परिणाम


'ट्रीपल-पिक'चे चांगले आणि वाईट परिणामही दिसून येतात असं सांगितलं जात आहे. या ट्रेण्डमुळे कामाच्या ठिकाणीचा वेळ आणि ऑफिसमधील वेळाचा उत्तम समतोल राखता येतो. खास करुन ज्यांना वेळेच्या मर्यादेत काम करायचं नसतं त्यांच्यासाठी हे फारच फायद्याचं असतं. उदाहरणार्थ काम आणि पालकत्व अशा दोन्ही बाजू संभाळणाऱ्यांना 'ट्रीपल-पिक'मुळे मुलांबरोबर अधिक वेळ घालवता येतो. मुलं झोपल्यानंतर सायंकाळी पुन्हा त्यांना कामाला बसता येतं. मात्र दुसरीकडे यामुळे ऑफिसचे तास आणि घरातील खासगी आयुष्यातील वेळ कोणता याबद्दल गफलत होण्याची शक्यता असल्याचंही सांगितलं जात आहे. या ट्रेण्डमुळे अनेक कर्मचारी वेळेपेक्षा अधिक काळ काम करतात. ठरलेल्या 9 ते 5 शिफ्टपेक्षा हे काम अधिक क्लिष्ट आणि जास्त वेळ होतं. 


कामाच्या तासांबद्दल स्पष्टता नसल्याने खासगी आयुष्यातील वेळही 'ट्रीपल-पिक'मुळे कामातच जाण्याची शक्यता अधिक असते. यामुळे मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. मात्र ते काहीही असलं तरी सध्या या प्रयोगाची जगभरातील कॉर्परेट क्षेत्रात चांगलीच चर्चा आहे.