ब्युरो रिपोर्ट : अमेरिकेत कोरोना व्हायरसचा कहर झाल्याने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविषयी नाराजी वाढली आहे. कोरोनाची साथ रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप ट्रम्प आक्रमकपणे खोडून काढत आहेत. त्याचवेळी कोरोना संकटासाठी जागतिक आरोग्य संघटनेला जबाबदार ठरवून ट्रम्प यांनी या संघटनेला अमेरिकेकडून दिला जाणारा निधी थांबवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रम्प यांच्यावर का आहे नाराजी?


अमेरिकेतील जनता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाराज आहे. कोरोना व्हायरसचा धोका असताना ट्रम्प यांनी सुरुवातीला त्याला महत्व दिले नाही आणि कोरोना व्हायरसच्या चाचण्या करायला उशीर लावला, असे आक्षेप ट्रम्प प्रशासनाबाबत घेतले जात आहेत.


जागतिक आरोग्य संघटनेबाबत ट्रम्प यांचे कोणते आक्षेप?


राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जागतिक आरोग्य संघटनेवर नाराज आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर तातडीने पावले उचलली नाहीत आणि अन्य देशांना वेळीच इशारा देऊन सावध केले नाही असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संघटना कोरोनाबाबतची माहिती वेळेत मिळवू शकली नाही, त्यावर उपाययोजनाही करू शकली नाही तसेच योग्य माहिती वेळेवर सर्व देशांना देऊ शकली नाही, असे आरोप ट्रम्प यांनी केले आहेत.


कोरोना व्हायरसचा फैलाव होत असताना जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका काय राहिली याचा आढावा घेतला जात असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.


जागतिक आरोग्य संघटनेकडून आरोपांचं खंडण


जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्यावरील आरोपांचे वस्तुस्थिती आणि आकडेवारी देऊन खंडण केले. आरोग्य आपत्कालीन कार्यक्रम विभागाचे टेक्निकल प्रमुख मारिया व्हॅन करकोव्ह यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेला ३१ डिसेंबर २०१९ रोजी न्युमोनियासंदर्भात पहिला अहवाल मिळाला. त्यानंतर त्यासंबंधित गाईडलाईन्स १० जानेवारीला कळविण्यात आल्या.


चीनने १२ जानेवारी रोजी व्हायरसच्या जनुकाबाबत माहिती दिली, असेही करकोव्ह यांनी सांगितले.


 



जॉन हॉपकिन युनिव्हर्सिटीने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत सहा लाखांवर लोकांना कोरोनाची लागण झाली असून २५ हजार ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात २० लाखांवर लोकांना कोरोनाची लागण झाली असून मृतांचा आकडा सव्वा लाखांवर पोहचला आहे.