पाकिस्तानात `विऑन` न्यूज चॅनलचे ब्युरो चीफ यांच्या अपहरणाचा प्रयत्न
झी समूहाच्या विऑन या इंग्रजी न्यूज चॅनलचे पाकिस्तानातील ब्युरो चीफ ताहा सिद्दीकी यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नवी दिल्ली : झी समूहाच्या विऑन या इंग्रजी न्यूज चॅनलचे पाकिस्तानातील ब्युरो चीफ ताहा सिद्दीकी यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार अडवून धक्काबुक्की
सिद्दीकी हे विमानतळावर जात असताना, १० ते १२ अज्ञात व्यक्तींनी त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सकाळी सव्वा आठच्या सुमारास हा प्रकार घडला. या अज्ञात जमावानं सिद्दीकी यांची गाडी अडवली आणि त्यांच्याशी धक्काबुक्की केली. त्यांचा पासपोर्ट, लॅपटॉप आणि मोबाईल फोन हिसकावून घेण्यात आला.
कशीबशी करून घेतली सुटका
मात्र, हल्लेखोरांच्या तावडीतून सिद्दीकींनी स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. दुस-या एका सहकारी पत्रकाराच्या ट्वीटर हँडलवरून ताहा सिद्दीकींनी घटनेची माहिती सर्वांना दिली. आपण सुरक्षित असून, सध्या पोलीस स्टेशनमध्ये आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
कुलभूषण जाधव प्रकरणाच्या वेळी ताहा सिद्दीकींनी पाकिस्तानातून जबाबदारीनं वार्तांकन केलं होतं. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातल्या या हल्ल्याकडं पाहिलं जातंय.