कॅनडा : 'काखेत कळसा नि गावाला वळसा' या म्हणीच्या उक्तीप्रमाणे आपल्या सगळ्यांना अनेकदा अनुभव आला असेलच. पण हा वळसा किती दिवस असू शकतो. एक, दोन जास्तीत जास्त महिनाभर... पण इथे घडलेला हा तब्बल १३ वर्षांचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅनडातील अल्बर्टा येथे राहणाऱ्या मेरी ग्राम्स या आजींच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. या आजींची २००४ मध्ये हरवलेली अंगठी त्यांना चक्क १३ वर्षांनी सापडली आहे. आणि ती देखील त्यांच्याच परसातल्या गाजरामध्ये. मेरी ग्राम्स या ८४ वर्षांच्या आजी इतर कोणत्याही सर्वसामान्य अमेरिकन माणसाप्रमाणे बाग-बगिच्यांची आवड असलेल्या आहेत. २००४ मध्ये आपल्या बागेत नेहमीप्रमाणे काम करत असताना त्यांची अंगठी बागेत पडली. खूप शोधल्यावरही अंगठी न मिळाल्यामुळे त्यांनी शोध थांबवला. अंगठी हरवल्याचं आपल्या पतीला कळू नये म्हणून त्यांनी तशीच एक मिळतीजुळती नकली अंगठी वापरायला सुरुवात केली.


अशीच १३ वर्षं निघून गेल्यानंतर एक दिवशी मेरी यांच्या सुनेला परसात लावलेली गाजरं खाण्याची इच्छा झाली. तिने झटपट एक दोन गाजरं उपटली आणि घरी आणून नीट धुतली. गाजर धुतल्यानंतर तिला गाजरात अंगठी दिसली. तिने ही माहिती तिच्या सासूला म्हणजे मेरी यांना दिली. आपली १३ वर्षांपूर्वी हरवलेली अंगठी पाहून मेरी आजींना भलताच आनंद झाला. मेरी यांनी आपली अंगठी परत मिळेल ही आशाच सोडून दिली होती. मात्र त्यांचा तो हरवलेला ऐवज एका गाजराने त्यांना परत मिळवून दिला.