वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा
आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होत असतात. या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण (Insurance Coverage) देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.
यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये तसंच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.
वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरि जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करतांना सांगितलं.
उजनी धरनातून सोडलं पाणी
आषाढी वारीसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे. दीड हजार क्यूसेक वेगानं भीमा नदीत पाणी सोडण्यात येतंय. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी कमालीची घटल्यानं गाळ मोरीतून पाणी सोडलं जातंय. हे पाणी 24 किंवा 25 जूनला पंढरपूरमध्ये पोहचेल. त्यामुळे स्वच्छ पाण्यात भाविकांना स्नान करता येणारेय. भाविकांना स्नानासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करुन द्यावं अशा सूचना, पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या होत्या.
दरम्यान, पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरीच्या वारीला निघालेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तरडगावकरांचा पाहुणचार स्वीकार फलटणकडे मार्गस्थ झालाय. भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, अभंगांच्या गोडीने अन् विठ्ठलाच्या ओढीने एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहेत. आज माऊलींची पालखी फलटणमध्ये मुक्कामी असणार आहे..
वनविभागाची वारी
वारी संप्रदायात संत तुकारामांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं म्हणत देत निसर्गाचं रक्षण करा ,वृक्ष लावा,प्राण्यांचे रक्षण करा असा संदेश दिला आहे. तोच संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सातारा आणि कराड वनविभागाचे अधिकारी वृक्षदिंडी घेऊन पंढरपूर पर्यंत जाणारे आहेत. या वृक्षदिंडीच्या माध्यमातून निसर्ग जोपासा, वाघाची शिकार करू नका, वनपरिक्षेत्राचे नियम आणि कायदे समजून घ्या, असा संदेश देत वाटचाल करते आहे.या दिंडीच्या निमित्ताने वनपरिक्षेत्रात कायम तैनात असणारा खाकी वर्दीतला वन अधिकारी टाळ मृदुंगाच्या तालावर फुगड्या खेळताना दिसला. हरिनामाचा गजर करत जनसामान्यांमध्ये मिसळण्याचा त्यांचा हा उपक्रम आहे...