मुस्लीम समाजाने वारकऱ्यांना भरवला गोड घास! पालखी सोहळ्यात शीरखुर्म्याचं वाटप
Sheer Khurma To Warkari: वारकरी पालखीसहीत आज इंदापूर तालुक्यामध्ये दाखल झाले असता येथील मुस्लीम समाजातील सदस्यांना त्यांना एक सुखद आणि गोड धक्का दिल्याचं पहायला मिळालं. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे.
Sheer Khurma To Warkari: आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi Wari 2023) पंढरपूरच्या वाटेवर असलेला जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज महाराजांचा लाखो वैष्णवांसह पालखी सोहळा (Sant Tukaram Maharaj Palkhi) आज इंदापूर तालुक्यात दाखल झाला. इंदापूरमधील निमगाव केतकीत इथं पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर गावामधील इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व युवक संघटनेनं वारकऱ्यांना एक सुखद धक्का दिला. मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व युवक संघटनेच्यावतीने वारकऱ्यांना शीरखुर्माचं (Sheer Khurma) वाटप करण्यात आलं. या कृतीमधून हिंदू-मुस्लीम ऐक्याचं अनोखं दर्शन वारीमध्ये घडल्याचं पहायला मिळालं.
अनेक वर्षांपासून राबवला जातोय हा उपक्रम
साधू संत येती घरात तोचि दिवाळी दसरा! याप्रमाणे हिंदू-मुस्लिम भेदाभेद न मानता आलेल्या वैष्णवांना गोडधोड खाऊ घालणे, हीच आपली परंपरा असल्याचं या मुस्लीम बांधवांचं म्हणणं आहे. पांडुरंगाची सेवा घडावी व जातीभेद नष्ट व्हावा म्हणून मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही हा उपक्रम मागील अनेक वर्षापासून राबवत असल्याचे यावेळी मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व युवक संघटनेकडून सांगण्यात आले. वैष्णवांनी देखील रांगा लावून या शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला.
वन अधिकारीही झाले सहभागी
दुसरीकडे आज सातारा आणि कराड वनविभागाचे अधिकारीही संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याचं पहायला मिळालं. वारी संप्रदायामध्ये संत तुकारामांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं म्हणत निसर्गाचं रक्षण करा, वृक्ष लावा, प्राण्यांचे रक्षण करा असा संदेश दिला आहे. हाच संदेश देण्यासाठी सातारा आणि कराड वनविभागाचे अधिकारी वृक्षदिंडी घेऊन पंढरपूरपर्यंत पालखीबरोब पायी जाणार आहेत. या वृक्षदिंडीच्या माध्यमातून निसर्ग जोपासा, वाघांची शिकार करू नका, वनपरिक्षेत्राचे नियम आणि कायदे समजून घ्या, असा संदेश देत वाटचाल केली जाणार आहे. या दिंडीच्या निमित्ताने वनपरिक्षेत्रात कायम तैनात असणारा खाकी वर्दीतील वन अधिकारी टाळ मृदुंगाच्या तालावर फुगड्या खेळताना दिसून आले. हरिनामाचा गजर करत जनसामान्यांमध्ये मिसळण्याचा त्यांचा हा उपक्रम असल्याचं वन विभागाने म्हटलं आहे.