गिरीश निकम, अँकर - सिनीअर प्रोड्युसर, झी २४ तास : पुण्यातील ऐन उमेदीचे दिवस... काळ वीस वर्षांपूर्वीचा... भारती विद्यापीठमध्ये इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगचा डिप्लोमा करुन व्यावसायिक मित्रासोबत कॉन्ट्रॅक्टची कामेही घेत होतो. अभिनयाचं, सिनेमांचं, लिहिण्याचं थोडं वेड होतं. त्यात वावरही होता. पण जीवनात अनेकदा न ठरवता, प्लॅनिंग न करता काही गोष्ट घडतात. काहीतरी वेगळे करण्याच्या उर्मीतून पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूमध्ये जर्नालिझमला प्रवेश घेतला. तेव्हा कधी वाटलं नव्हतं की अँकरींगच्या विश्वात आपण असणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीला जळगावमध्ये प्रिन्ट मीडियात काम करीत होतो. रानडे इन्स्टिट्यूमधील मैत्रिण अनुपमा खानविलकर ई टीव्हीला अँकरिंग करायची. ती करु शकते. तर आपणही करु शकतो, असा विश्वास वाटला आणि त्या दिशेने पाऊलं पडली. काही मित्र टीव्ही न्यूजमध्ये कार्यरत असल्यानं खान्देशमधून मुंबई खुणावू लागली. निर्णय घेतला आणि 'स्टार माझा'च्या रुपानं मुंबईत पहिलं पाऊलही टाकलं. तेथून सुरु झाला टीव्ही जगतातला प्रवास...साम टीव्हीत असताना डेस्कवर काम करताना भरपूर रिपोर्टिंग केलंही. त्यामुळे कॅमेऱ्याची भिती गेली. उलट वेगवेगळे प्रयोग करुन कसे पीटीसी करता येतील याचा प्रयत्न असायचा.


डेस्कवर काम करताना व्हाईस ओव्हर द्यायला लागलो. अँकरिंगच्या विश्वात प्रवेश करताना ही पहिली पायरी म्हणूया... तुमचा आवाज चांगला, त्याला चढ-उताराची जोड आणि उच्चार स्पष्ट हवेत...बातम्यांच्या पॅकेजला व्हाईस ओव्हर देऊन तुमची शब्दांवर पकड आणखी मजबूत करु शकता. विविध शब्द तोंडात घोळल्यानं फायदा होतो. ज्येष्ठ पत्रकार राजू पळुरेकर यांनी अँकर वर्गाला मार्गदर्शन करताना मलाही कॅमेरासमोर बातम्या वाचायला सांगितल्या. काय चुकतंय ते सांगितलं. बातम्या वाचताना कपाळावर आठ्या अजिबात नको. सहजता, उत्स्फूर्तता आणि स्टोरी टेलिंगचं महत्त्व त्यांनी सांगितलं.


तुम्ही बातम्या सांगताना प्रेक्षक थांबला पाहिजे. तुम्ही सांगताय त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणखी एक गैरसमज असतो तो म्हणजे अँकर हा दिसायला सुंदर पाहिजे. रुबाबदार पाहिजे. पण असं काही नाही. बौद्धिक हुशारी महत्वाची...तुमची सादरीकरणाची हातोटी आणि अभ्यासून प्रकटावे ही गोष्ट जास्त महत्वाची आहे.  झी २४ तासमध्ये गेल्या १० वर्षांत डेस्कवर काम करताना अँन्करींग हा माझ्या कामाचा महत्वाचा भाग राहिला आहे. 


शिस्त आणि सजगता हवीच
अँकरसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे अपडेट असणे. भोवतालच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन आणि अगदी क्राईम क्षेत्रातील मोठ्या घटनांचे संदर्भ माहित हवेत. जेणेकरुन त्या बातमीबाबत काही अपडेट आल्यास तुम्हाला सफाईने बोलता येईल किंवा रिपोर्टर लाईव्ह, फोनोच्या वेळेस तुम्हाला संदर्भाची मदत होईस. त्यातून स्क्रिनवरील आत्मविश्वासही वाढतो..


'आड्यात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार' अशी मराठीत म्हण आहे. वाचलंच नाही तर बोलता कसं येणार...? त्यामुळे दररोजचं पेपर वाचन (किमान एक इंग्रजी आणि एक मराठी दैनिक) आवश्यक नाही तर अनिवार्य आहे. लोकलमध्ये वाचा, ऑफिसमध्ये वेळ असेल तेव्हा पेपर वाचा. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी मात्र आठवड्यातील महत्वाचे लेख जरुर वाचा....विषयाचं बंधन नाही. आणि हो! इतर वाहिन्यांवरील बातम्या..त्यांचं सादरीकरणही आवर्जून बघितलं पाहिजे.


जर्नालिझम म्हणजे 'बॅचरल ऑफ मेनी मास्टर ऑफ नन' असं म्हटलं जातं. पत्रकाराला सगळ्या विषयातलं थोडं-थोडं माहिती असतं. पण आता तसं राहिलं नाही. दैनिक 'सकाळ'मध्ये असताना तत्कालीन संपादक विश्वास देवकर नेहमी सांगायचे...एखाद्या विषयात मास्टर व्हा...त्या विषयावर अभ्यास वाढवा...लिहीत राहा...भविष्यात तुम्हाला फायदा होईल. त्या विषयात काही घडलं तर लोकांनी तुम्हाला विचारलं पाहिजे...इतपत सखोल अभ्यास झाला पाहिजे. अँकरिंगमध्येही त्याचा फायदा होऊ शकतो. 


बातम्या देताना किंवा मुलाखत घेताना तुमचा अभ्यास असल्यानं छाप पडते. स्टुडिओत बातम्या देताना तुमचा मानसिक शक्तीचा कसही लागतो. कितीही तणावपूर्ण आणि वेगात मोठ्या बातम्या धडकल्या तरी डोकं शांत ठेवुन बातमीपत्र पुढे नेणे हे कौशल्यपूर्ण काम आहे. पीसीआर आणि डेस्कच्या सहकाऱ्यांच्या सुचनांकडे लक्ष ठेवुन आत्मविश्वासानं बातमीपत्र सादर करणे महत्वाचं आहे. त्यासाठी स्टुडीओत जाण्यापूर्वी रनडाऊन वाचण्याची शिस्त हवी. बुलेटन प्रोड्युसरशी संवाद हवा...मला सगळं माहितेय..ऐनवेळी काहीही हाताळू शकतो असा ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. 


मानसिक आणि शारिरीक फिटनेस 
जसं क्रिकेटच्या अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या बॉलपर्यंत काय होईल सांगू शकत नाही. तसंच बुलेटीनमध्ये कधी कुठल्या क्षेत्रातील मोठी बातमी येऊन धडकेल हे सांगू शकत नाही. केवळ काही बातम्यांचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. की ही बातमी हळूहळू मोठी होईल.


एखादा अपघात असेल किंवा कुणा मान्यवर व्यक्तीचं निधन झालं असेल किंवा सत्तेला सुरुंग लावणारी मोठी राजकीय घडामोड घडली असेल. अशावेळी अपडेट येत असतानाच अँकरने पूरक माहिती जवळ बाळगून तयारीत राहावं. कारण तुम्हाला मोठ्या बातमीचा सगळा माहौल पुढे कौशल्यानं न्यायचा असतो. अशा वेळी माईंड फिटनेस कामाला येतो.


योगा, प्राणायामाची जोड असेल तर एकाग्रता साधली जाते. आणि मोठ्या ब्रेकींगचा दबाव असताना हीच एकाग्रता कामी येते. चुका होत नाहीत. तुम्ही सहजतेने बातमीपत्र पुढे नेता. शारिरीक तंदुरुस्तीही तितकीच महत्वाची आहे. 'फिटही हीट है' हे खरे आहे. खाण्यापिण्याची पथ्य पाळावीच लागतील. शेवटी आवाज जपणे महत्वाचे आहेत. कारण त्यावरच बरीचशी लढाई आहे. 


आवाज खराब झाला असेल बसला असेल तर अँकरींग करता येणार नाही. बातम्या वाचताना खोकला येणार नाही, ढास लागणार नाही. याची काळजी घ्यावी लागेत. आजारी असूनही स्टुडिओत जाणं आवश्यकच असेल तेव्हा तुमच्या क्षमतांची कसोटी लागते. प्रेक्षकांना कळू न देता, थकवा न दिसता अचूकतेने बातमीपत्र सादर करणे दिव्य काम आहे. 


पडद्यामागच्या गमतीजमती
अँन्करच्या कानात इयरफोन असतो. पीसीआर मधून (प्रोडक्शन कंट्रोल रुम) त्याला सतत सूचना येत असतात. पुढची बातमी कोणती किंवा एखादी ब्रेकिंग बातमी आली तर पीसीआरमधून किंवा डेस्कवरील टॉक बॅकवरुन अँकरला सुचना केल्या जातात. पण एखाद्यावेळी सूचना ऐकू येत नाही. तांत्रिक अडचणी येत कॅमेरा समोरचं प्रॉम्पटर अचानक वाचता- वाचता बंद पडतं. अशा वेळी गडबडून न जाता ती वेळ मारुन न्यावी लागते. काही घडलंच नाही अशा अर्विभावात तुम्हाला निभावून न्यावं लागतं.


कधी खोकल्याची उबळ आली...अचानक काही त्रास झाला तर पीसीआर तुमचा आवाज बंद करुन तुम्हाला पाणी पिण्यासाठी अवधी देतात. ब्रेकच्या वेळी किंवा पॅकेज सुरु असताना अँकर स्वत:ला सावरु शकतो. निदान पुढचा अँकर येईपर्यंत स्टुडीओतली लढाई त्याला एकट्याला लढावी लागते. क्षणात स्वत:ला सावरावं लागतं. 


कधी-कधी लाईव्ह गेस्ट किंवा लाईव्ह फोनो घेताना समोरची व्यक्ती फार आक्रमक होऊ शकते. अशा वेळी शांततेने परिस्थिती हाताळता आली पाहिजे. कारण सुत्रे तुमच्या हातात असतात. पुढची बातमी कोणती आहे हे लॅपटॉपच्या रनडाऊनमध्ये अँकर पाहू शकतो. अँकरींगच्या विश्वात दिर्घकालीनं प्रभावशाली कामगिरी करायची असेल तर तुमची जास्तीत जास्त बातमीपत्र सादर करण्याची क्षमताही वाढवायला लागेल.


अर्थसंकल्प, निवडणूक निकाल किंवा इतर आपत्कालीन प्रसंगी तुम्हाला काही तास स्टुडीओमध्ये थांबून बातमीपत्र सादर करायला लागू शकतं. किंवा चर्चात्मक कार्यक्रम करावा लागू शकतो. टीव्हीमध्ये काम करताना एक दिवस चांगलं काम करुन चालणार नाही. एक दिवस वाघ मारला (म्हणजेच चांगलं काम केलं) आणि आठ दिवस शांत बसला...हे न्यूज विश्वात चालणार नाही. कारण आपली रोजची लढाई असणार आहे. हे विसरुन चालणार नाही.


स्टुडीओतील कॅमेराच्या विश्वात शिरताना कौटुंबिक काही कुरबुरी असतील...काही मनाविरुद्ध घटना घडल्या असतील तर त्या स्टुडीओच्या बाहेरच ठेवून यायचं...चेहऱ्यावर त्याची छटाही दिसता कामा नये. ज्यानं मन जिकलं त्यानं जग जिकंल असं म्हटलं जातं. तसचं ज्याने एकाग्रता कमावली...वाचन वाढवलं, शिकण्याची वृत्ती कायम ठेवली तर त्यानं अँकरिंगचं विश्व जिंकलंच म्हणून समजा...