महेश पवार, झी मीडिया, मुंबई : राज्यात कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचे वाहणारे वारे उद्या शांत होतील. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मंगळवारी 12 एप्रिलला मतदान होत आहे. तर शनिवारी मतमोजणी होऊन दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल लागेल. रविवारी या निडणुकीसाठी प्रचाराचा अखेरचा दिवस होता. प्रचाराच्या या दिवसाची सुरवात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर शेवट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपचे सर्वच महत्वाचे नेते कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. कारण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडी आणि भाजप दोघांनीही ही जागा प्रतिष्ठेची केलीय.


काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन



कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे २ डिसेंबर २०२१ ला मध्यरात्री दोन वाजता कोरोनामुळे निधन झाले. कोरोनाची लागण झाली तरी शहराच्या प्रत्येक प्रश्नात ते लक्ष घालत होते. त्यातच त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यांना हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या अन्ननलिकेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याच वेळी त्यांचा रक्तदाब कमी झाला. तो शेवटपर्यंत नियंत्रणात आला नाही आणि त्यातच त्यांचे निधन झाले.


चंद्रकांत जाधव हे तसे भाजपचेच. कोल्हापूर महापालिकेत त्यांच्या पत्नी जयश्री आणि बंधू संभाजी हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले. पण, विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून ते निवडूनही आले. 2004 आणि 2019 चा अपवाद वगळता 1990 पासून या जागेवर कायम शिवसेना निवडून आली. 2014 मध्ये शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसचे सत्यजित कदम यांचा पराभव केला होता. त्याच राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत चंद्रकांत जाधव यांनी ही जागा पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणली. मात्र, चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले आणि या जागेसाठी पोटनिवडणूक लागली.


बिनविरोधचा प्रयत्न फसला



जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेली जागा बिनविरोध व्हावी म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रयत्न केले. पण, भाजपने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कॉग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना तर, भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली.


शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचे बंड



सत्यजित कदम हे काँगेसमध्ये असताना त्यांचा शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला. तेच सत्यजित कदम पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार आहेत. ही जागा शिवसेनेची असताना काँगेस उमेदवार का असा प्रश्न करत राजेश क्षीरसागर यांनी बंडाचे निशाण फडकावले. काही झाले तरी माघार घेणार नाही असा त्यांनी निश्चय केला होता.


राजेश क्षीरसागर यांचे बंड शमले


राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. ज्या जागेवर ज्या पक्षाचा आमदार होता. त्याच पक्षाकडे ती जागा कायम राहणार असल्याचं महाविकास आघाडी सरकारचं सुत्र आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश येताच राजेश क्षीरसागर यांचे बंड शमले.


करुणा शर्मा यांची एंट्री



सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करून चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांनीही उमेदवारी अर्ज भरून ही निवडणूक रंगतदार केलीय. शिवशक्ती सेनेच्या तिकीटावर त्या निवडणूक लढवत आहेत. १३ कोटी जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची माझी इच्छा आहे. महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार असल्याचं त्या म्हणाल्यात.


अभिजित बिचुकलेची माघार तरी बहुरंगी लढत



जयश्री जाधव विरुद्ध सत्यजित कदम यांच्या जोरदार लढत होणार हे स्पष्ट असताना अन्य काही पक्षही रिंगणात उतरले आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आम आदमी पक्ष या निवडणुकीत उतरणार होता. पण त्यांनी माघार घेतली. रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे उमेदवार बाळ नाईक यांनीही निवडणुकीत उडी घेतलीय. बिग बॉस फेम साताऱ्याचे अभिजित बिचुकले यांनी निवडणूक लढविण्याचा इरादा व्यक्त केला. पण, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. तरीही बऱ्याच अपक्षांनी अर्ज भरला आहे.


भाजपाचा वचननामा - सांगेल ते करणार आणि करेल तेच सांगणार


भाजपने या निवडणुकीत वचननामा जाहीर केलाय. एका मतदारसंघासाठी स्वतंत्र वचननामा जाहीर करून भाजपने प्रचारात 'आघाडी' घेतली. या वचननाम्यात अगोदर केलेली विकास कामे आणि नंतर करणार असलेली विकास कामे याचा उल्लेख केलाय. 'सांगेल ते करणार आणि करेल तेच सांगणार' हा भाजपाचा बाणा असून, भाजपाचा जाहिरनामा हा आमच्यासाठी वचननामा आहे असं भाजप नेत्यांनी यावेळी सांगितलं.


आमचं ठरलंय...


ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपण प्रयत्न करणार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बोलणी करणार असल्याचं  सुतोवाच केलं. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'कोणीतरी ही निवडणूक बिनविरोध होईल असं सांगत आहेत. माझं वर बोलणं सुरू आहे असं काही नेते सांगत आहेत. पण, माझ्यावर कोण आहे हे मला माहित नाही, असा टोला लगावत 'आमचं ठरलंय' असं सांगितलं होतं.


तीन लाख मतदार, तीन लाख कार्यकर्ते


उत्तर विधानसभा मतदार संघात तीन लाख मतदार आहेत. त्यामुळे तीन लाख कार्यकर्ते राज्यभरातून प्रचारासाठी येतील असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीत वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खिल्ली उडवत तीन लाख कार्यकर्ते आणून कोल्हापूरात युद्ध करायचे आहे काय? असा सवाल करत तीन लाख कार्यकर्त्यांना युक्रेनला युद्धात पाठवा असा सल्लाही दिला होता.


प्रचारात हिंदुत्व... आणि टीका टोमणे



निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये एका कॅलेंडरवर 'जनाब बाळासाहेब ठाकरे' ( Janab Balasaheb Thackrey ) असं छापून ती कॅलेंडर वाटली गेली. तेव्हाच, सेनेचं हिंदुत्व कुठं गेलं हे कळलं असा टोला लगावला. भारतीय जनता पक्षाचा श्वास हिंदुत्व आणि विकास आहे. कोल्हापूर उत्तर हा हिंदुत्ववादी मतदारसंघ आहे. इथल्या मतदारांची केमिकल केमेस्ट्री बदलली आहे. पॉलिटकल केमिस्ट्री बदलली आहे. या मतदारसंघात दहशतीचे वातावरण आहे. हा महाराष्ट्र आहे की बंगाल असा प्रश्न पडला आहे, अशी टीका केली.


भाजपनं काय केलं? उद्धव ठाकरे यांचा सवाल



सीमा भागातील मराठी बांधवांवर अन्याय, अत्याचार केला जातो. त्यावेळी भगव्याच्या रक्षणासाठी किती भाजपवाले रस्त्यावर उतरले? बेळगाव महानगरपालिकेवर असणारा भगवा काढला. तिथं खोटा भगवा लावला. कर्नाटकमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्यावेळी भाजपवाल्यांनी काय केलं? असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व  सोडलं असं नाही. तुम्ही म्हणजेच हिंदुत्व असं काही नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.


नकली 'हिंदुहृदयसम्राट'


देशात 'हिंदुहृदयसम्राट' असं एक बनावट नाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो लोकांनी हाणून पाडला. आता भाजपने 'हिंदुहृदयसम्राट' यांच्या नावांमध्ये जनाब असं लावण्याचा प्रयत्न केला. आता यांचा नकली बुरखा फाडायलाच पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीचा प्रचार करताना ठणकावलं.


भाजपची प्रतिष्ठा


गेले दोन महिने सुरु असलेला कोल्हापूर पोटनिवडणुकीचे हे वादळ आता उद्या मतदानानंतर शांत होईल. कोल्हापूर जिल्हा हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा बालेकिल्ला मानण्यात येतो. मात्र, हा बालेकिल्ला सोडून चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरूड मतदारसंघात यावं लागलं. कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळे भाजपनं ही जागा प्रतिष्ठेची केलीय.


महाविकास आघाडीचा धर्म


ज्या जागेवर ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाकडे ती जागा हे महाविकास आघाडीचे सूत्र आहे. त्यानुसार ही जागा काँग्रेसला मिळाली. सुरवातीची कुरबुर वगळता आता महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष जयश्री जाधव यांच्या विजयासाठी झटत आहेत. मात्र, या निवडणुकीत जनतेचा कौल कुणाला मिळणार हे मात्र शनिवार स्पष्ट होणार आहे.