झी मराठी ‘प्रस्तुत आणि राहुल भंडारे यांच्या अद्वैत थिएटरची निर्मिती असलेल्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकानं सध्या रंगभूमीवर एक वेगळीच बहार आणली आहे. १५ ऑगस्टला या बालनाट्याचे तब्बल पाच प्रयोग एकाच दिवशी रंगणार आहेत. मुंबईतल्या शिवाजीमंदिरमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत हे प्रयोग होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिन्मय मांडलेकर यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘अलबत्या गलबत्या’नं अल्पावधीतच नव्वदीचा प्रवास पार करत आता शंभराव्या प्रयोगाकडे धमाकेदार वाटचाल सुरू केली आहे. सध्या रंगभूमीवर बालनाट्यांची अवस्था फार बरी नाही हे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर ‘अलबत्या गलबत्या’ला मिळणारा उदंड प्रतिसाद आणि नाट्यगृहाबाहेर झळकणारे ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड त्याचं यश अधोरेखित करतात. 


रत्नाकर मतकरींच्या शब्दांची जादू...


ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीची जादू कशी आहे, याचा साक्षात्कार म्हणजे ‘अलबत्या गलबत्या.’ एवढ्या वर्षांनंतरही पुन्हा नव्यानं हे नाटक रंगभूमीवर दाखल झालं आणि बच्चेकंपनीचा एवढा मोठा प्रतिसाद मिळतो आहे ही मतकरी यांच्या सदाबहार लेखणीचीच कमाल म्हणावी लागेल. प्रेक्षागृहांमध्ये आबालवृद्धांना हे नाटक खिळवून ठेवतंच, त्याचबरोबर कलाकारही हे नाटक अक्षरशः जगत आहेत. मतकरींच्या शब्दांची जादू अशी काही आहे की संपूर्ण नाटकात कलाकार रंगमंचावर धमाल करतात.


‘वैभव’शाली प्रयोग...



खरं तर याआधी दिलीप प्रभावळकर यांनी गाजवलेलं हे नाटक आता नव्या रूपात, नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आता अभिनेता वैभव मांगले यांच्या अफलातून अभिनयाची धमाल या नाटकात पाहायला मिळते आहे. प्रत्येक प्रयोगागणिक वैभव यांचा दिसणारा कमालीचा उत्साह आणि अफाट ऊर्जा हे या नाटकाचं वैशिष्ट्य आहे.


चिंची चेटकिणीची ही भूमिका रंगवताना वैभव यात जी काही बहार आणत आहेत त्याची पोचपावती प्रयोगानंतर त्यांच्याभोवती पडणाऱ्या आबालवृद्धांच्या गराड्यावरून मिळते. एकीकडे ‘वाडा चिरेबंदी’सारखं गंभीर प्रवृत्तीचं नाटक, तर दुसरीकडे ‘अलबत्या गलबत्या’सारखं विनोदी पद्धतीचं नाटक करताना वैभव यांनी जी एकाग्रता आणि जो आंतरिक उत्साह दाखवलाय तो नक्कीच कौतुकास्पद आहे. मुलांना घाबरवणारं हे नाटक नव्हे, असं सांगत वैभव यांनी  या नाटकामुळे मुलांसाठी काहीतरी वेगळं करायला मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. 


कलाकारांचा अफलातून उत्साह...



थरार, उत्सुकता आणि विनोदाची धमाल अशी तिहेरी मेजवानी या नाटकाच्या निमित्तानं रसिकांना मिळत आहे. वैभव मांगले आणि संपूर्ण नाटकाच्या टीमपुढे एकाच दिवसात पाच प्रयोग यशस्वीपणे करण्याचं आव्हान आहे. त्यासाठी ही मंडळी जोमानं तयारीलाही लागली आहेत. वैभव यांच्याबरोबरच सनीभूषण मुणगेकर, संदीप रेडकर, बाळकृष्ण वानखेडे, कुणाल धुमाळ, दीपक कदम, सायली बाणकर, श्रद्धा हांडे, सागर सातपुते, दिलीप कराड अशी दहा कलाकारांची ही हौशी फौज आपल्या अफलातून उत्साहानं प्रेक्षकांना मनमुराद हसवण्यात यशस्वी झाली आहे.


प्रेक्षकांना हसवत हसवत या नाटकानं शतकी पल्ला कधी गाठला हे या कलाकारांनाही कळलं नाही. मात्र सर्वांची जमलेली भट्टी आणि प्रेक्षकांची मिळणारी दाद यामुळे नाटकाचे प्रयोग अधिक रंगतदार होऊ लागलेत.  आता प्रेक्षकांसह कलाकारांनाही उत्सुकता लागली आहे ती १५ ऑगस्टला होणाऱ्या सलग पाच प्रयोगांची.


नातवांसह आजी-आजोबाही हजर...


‘अलबत्या गलबत्या’या बालनाट्याला फक्त बच्चेकंपनी नाही तर आजी-आजोबाही येतात. शाळा सुटल्यानंतर वर्गच्या वर्ग थेट थिएटरमध्ये नाटक पाहण्यासाठी आल्याची आठवण निर्माते राहुल भंडारी यांनी सांगितली. सध्या अनेक लहान मुलं टीव्ही, गेम, कार्टून्स, मोबाईल यात गुंतून गेलेले दिसतात,अशावेळी या मुलांना नाट्यगृहांमध्ये आणण्याचं महत्त्वाचं काम या नाटकानं केलं आहे. नाटकाला येणारी लहान मुलं चेटकिणीला पाहून सुरुवातीला घाबरून जातात, मात्र प्रयोग संपतासंपता मुलांच्या चेहऱ्यावरची खुललेली कळी या बालनाट्याचं सार्थक झाल्याची पोचपावती देते. 


एकाच दिवशी पाच प्रयोग...



 


१५ ऑगस्टला या नाटकाचे दादर येथील शिवाजीमंदिरमध्ये पाच प्रयोग होत आहेत. कलाकारांच्या दृष्टीनं हे एक आव्हान आहे. नाटकावेळी दिवसभर दोन तज्ज्ञ डॉक्टर हजर असणार आहेत. तसंच या विक्रमी पाच प्रयोगांची गिनीज बुक आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.


एकूणच या सलग पाच प्रयोगांची प्रेक्षकांमध्ये जशी उत्सुकता आहे तशीच ती  नाटकाच्या प्रत्येक सदस्याला आहे. प्रेक्षकांचा मिळणारा उत्साही प्रतिसाद या कलाकारांसाठी टॉनिक ठरत आहे.  शतकमहोत्सवी प्रयोगाकडे वेगानं घोडदौड केलेल्या या ‘वैभव’शाली प्रयोगाला आपणही शुभेच्छा देऊ.