ब्लॉग : ...आणि आता शंकर रुसला!
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथ होतेय. त्या घटनांचा पुसटसा आधार घेत `...आणि अखेर शंकराने नंदीला फटकारले` या काल्पनिक सोहळ्याचा हा दुसरा अंक...! काही व्यक्तीरेखांमध्ये साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा
कैलास पुरी,
झी मीडिया, पिंपरी चिंचवड
(गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथ होतेय. त्या घटनांचा पुसटसा आधार घेत '...आणि अखेर शंकराने नंदीला फटकारले' या काल्पनिक सोहळ्याचा हा दुसरा अंक...! काही व्यक्तीरेखांमध्ये साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा)
काका आणि पुतण्याच्या ताब्यातून पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता प्रस्थापित केल्यानंतर आता जग जिंकल्याचा आविर्भावात राम आणि लक्ष्मण अर्थात शंकर होता...! सुरुवातीचा काळ गेला ही तसाच...! पुतण्याचा बालेकिल्ला काबीज केला म्हणजे आनंद तर होणारच! पण हा आनंद फार काळ टिकला नाही... खासकरून शंकरासाठी... शंकराच्या नंदीने घातलेल्या धुमाकुळानं शंकर चांगलाच व्यतिथ झाला. त्यानंतर शंकराने नंदीला फटकारलेही... पण तरीही शंकर अस्वस्थच राहू लागला...
नंदीला फटकरल्याची वार्ता पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली खरी पण शंकराला त्याचा म्हणावा तसा फायदा झालाच नाही! पंचक्रोशीच्या अविकसित भागाच्या विकासासाठी ४२५ कोटी मुद्रेची कामे एकाच दिवशी मंजूर केल्यामुळे उठलेले वादळ काही केल्या शांत होण्याची चिन्ह दिसत नसल्यानं शंकर आणखीच अस्वस्थ झाला... विरोधकांच्या हाती ४२५ कोटी मुद्रांचे आयते कोलीत गेल्याने आणि त्याला काही अ'पारदर्शक' वर्तमानपत्रे नको तेवढे महत्त्व देत असल्याने मार्ग काढायचा कसा? या विवंचनेतच शंकर राहू लागला आणि नंदीवरचा त्याचा राग आणखीच वाढू लागला.
पंचक्रोशीतल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोजित स्वास्थ्य मेळाव्यात ही शंकराचे मन रमले नाही. त्यातच नंदीला फटकरल्यानंतर ज्या खऱ्या शंकराने मध्यस्थी केली होती त्या खऱ्या शंकरावरही हा शंकर खप्पामर्जी झाला. राजकारणरुपी संग्रामात असल्यापासून शंकर कायम नगरीवर राज्य करत आलेला. पण आता ज्या पद्धतीने आरोपांच्या फैरी झडल्या, असा बाका प्रसंग कधीच आला नव्हता. नगरीचा सम्राट पुतण्या असला तरी राजा मात्र शंकर होता आणि राजावर वार होण्यापूर्वी मावळेच हल्ला परतवून लावायचे...! पण आता नंदीमुळे किती तरी मावळे नाराज झालेले... शंकराकडे जायलाच नको, अशी धारणा त्यांची झालेली... मग होत असलेले हल्ले कोण परतवणार? त्यामुळे शंकराला काय करावे हे समजायला अवघड जाऊ लागले.
त्यातच देवेंद्रच्या राज्यरुपी अष्टप्रधान मंडळात स्थान मिळण्यासाठी कितीतरी दिवस देव पाण्यात ठेवलेले... पण भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागल्याने या प्रयत्नांना खीळ तर बसणार नाही ना? अशी भीती शंकराला वाटू लागली... पण करणार काय, जे पेरले तेच उगवणार...! इथे तर उगवलेच नाही तर फोफावले... त्यामुळे हतबल झालेला शंकर चांगलाच रागवला... फक्त रागावलाच नाही तर काही काळ तो अलिप्त झाला आणि अनेकांवर रुसला... एवढा रुसला की नगरीत होत असलेल्या विकास कामांच्या उद्घाटनालाही आला नाही... तिकडे नगरीच्या लोकांनी मनात 'हा रुसवा सोड सखे! पुरे हा बहाणा सोड ना अबोला! झुरतो तुझ्याविना, घडला काय गुन्हा? बनलो निशाना, सोड ना अबोला!' हे गाणे तरळू लागले आणि पुन्हा एकदा राजकारणाचे वर्तुळ पूर्ण झाले...!