ब्लॉग : ...आणि अखेर शंकराने नंदीला फटकारले

राज्य कोणी ही करत असो, प्रत्येक शहरात एक शंकर आणि त्याचा नंदी असतो...! या नंदीला शंकराने आपल्या पेक्षा मोठे होऊ देऊ नये अशी सर्वांची इच्छा असते...! त्या इच्छेचा मान राखत हा काल्पनिक सोहळा...!)

Updated: Dec 26, 2017, 09:05 PM IST
ब्लॉग : ...आणि अखेर शंकराने नंदीला फटकारले title=

(टीप : राज्य कोणी ही करत असो, प्रत्येक शहरात एक शंकर आणि त्याचा नंदी असतो...! या नंदीला शंकराने आपल्या पेक्षा मोठे होऊ देऊ नये अशी सर्वांची इच्छा असते...! त्या इच्छेचा मान राखत हा काल्पनिक सोहळा...!)

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड... हे आटपाट नगर खरे तर जाणते राजे आणि त्यांच्या पुतण्याचे... पण फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महापालिका निवडणूकरुपी रणसंग्रामात इथं त्यांचा सपशेल पराभव झाला आणि त्यांना नगरातून बाहेर जावे लागले...

पिंपरी चिंचवड नगरात कारभारी बदलले... राम-लक्ष्मण जोडीने राज्य कारभार हाकायला घेतला... पिंपरी चिंचवड आटपाट नगर आता पूर्णपणे लंडन किंवा न्यूयॉर्क नगरासारखे होईल, या आशेने नगरवासीय नव्या कारभाऱ्यांकडे पाहत होते. नगरीचा कारभार पारदर्शक होणार, इथे प्रत्येकाला विचार मांडण्याचे स्वातंत्र्य असणार अगदी हेवा वाटावे असे राज्य होणार, अशी भाबडी आशा सगळ्यांनी बाळगली... राम लक्ष्मण जोडीने त्यांना हवे ते शिलेदार राज्य कारभार हाकण्यासाठी बसवले... रामाने त्यांच्या एका शिलेदाराला नगरीचा प्रथम नागरिक बनवले! तर लक्ष्मणाने शहराचा दूरदृष्टीने विकास व्हावा या साठी आर्थिक नाड्या हातात ठेवत आपला शिलेदाराला अर्थमंत्री करून टाकले... इतर ही शिलेदारांना विविध जबाबदाऱ्या मिळाल्या आणि सुरू झाला विकासाचे नवे पर्व...!

हे नवे पर्व सुरू होत असतानाच कारभार ज्या वाड्यातून होतो तिथे लक्ष्मण अर्थात शंकराने त्यांचा एक नंदी देखरेखीसाठी पाठवला...! या नंदीवर शंकराचा एवढा विश्वास की, इतर सुभेदारांना त्यांच्या लेखी किंमत शून्य... मग काय वाड्याच्या पहिल्या मजल्यापासून चौथ्या मजल्यापर्यंत नंदीचा मुक्त वावर सुरू झाला... तिसऱ्या मजल्यावर तर या नंदीने धुमाकूळ घातला... नगरीच्या सर्वांगिण विकासासाठी नंदीने अतोनात प्रयत्न सुरू केले... पण ते करत असताना नगरीचे कमी स्वतः चे हित पाहण्यासाठी झटत असल्याचा आरोप इतर सुभेदार दबक्या आवाजात करू लागले... पण शंकराला हे सांगायचे कसे? या भीतीने सगळे सुभेदार गलितगात्र झाले. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करू लागले... इकडे खुद्द शंकराचा आदेश असे सांगत नंदी शंकरापेक्षा मोठा झाला...! 

शंकराच्या कानावर अनेक तक्रारी गेल्या तरी शंकराने त्याच्याकडे दुर्लक्ष केले... त्यामुळे तर सुभेदार आणखीच बिथरले... पण अखेर नंदीवर शंकराला तिसरा डोळा उघडण्याची वेळ आलीच...! नगरीच्या अविकसित भागाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नंदीच्या दूरदृष्टीतून एकाच दिवशी चारशे कोटीहून अधिक मुद्रांचे काम निघाले...! या कामात प्रचंड अफरातफर झाल्याची चर्चा सुरू झाली... खुद्द शंकरावरच आरोप होऊ लागले...! कित्येक वर्षे राजकारण रुपी रणसंग्रामात असून ही शंकरावर असे आरोप होत नव्हते पण, आता मात्र त्यांना चांगलाच धक्का बसला...

वर्तमानपत्र रुपी संदेश वाहकामध्ये प्रचंड आरोप झाले... आणि या शंकराने अखेर तिसरा डोळा उघडत नंदीला चांगलेच डाफरले... नंदी मला तुझी गरज नाही, तू माझ्याकडे येत जाऊ नको, अशा शब्दात शंकराने नंदीला सुनावले...! आतापर्यंत स्वतःलाच शंकर समजू लागलेल्या या नंदीची नशा अखेर उतरली...! तिसरा डोळा उघडल्यानंतर खरा शंकर अखेर नंदीच्या मदतीला धावून गेला आणि त्यांनी कॉम्प्रमाईज करून दिले... पण तेव्हापासून नंदी नरमला आणि जरा शांत झाला... इकडे इतर सुभेदार हेही नसे थोडके म्हणून आनंदी झाले आणि असेच नंदीला फटकारले जावे अशी इच्छा सुभेदारांनी व्यक्त केली...