जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई :  अमळनेरमध्ये डॉ. बी एस पाटील पहिल्यांदा भाजपाचे आमदार झाले, यानंतर तालुक्यात भाजपा वाढली, तालुक्यातील गावागावात भाजपाच्या पाट्या लागल्या. बी एस पाटील यांच्यासोबत अनेक तरूण कार्यकर्ते वाढले. जनता दल आणि काँग्रेसच्या पुढाऱ्यांना बाजूला सारून तरूण पुढाऱ्यांनी, ग्रामपंचायतीपासून, पंचायत समिती ते जिल्हा परिषद, जिल्हा बँक ते थेट कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंतची पदं पटकावली. कार्यकर्त्यांच्या याच फळीच्या जोरावर तालुक्यात सतत १५ वर्ष भाजपाकडून आमदार राहण्याचा विक्रम डॉ. बी एस पाटील यांनी केला. डॉ. बी. एस. पाटील यांच्यासोबत अनिल भाईदास पाटील जे सध्या राष्ट्रवादीत आहेत, त्यांनी देखील भाजपाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत सदस्य राहण्याचा विक्रम केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासोबत उदय वाघ, त्यांच्या पत्नी स्मिता वाघ यांनी देखील संघटन मजबूत केलं. बी एस पाटील हे आमदारपदावर पोहोचले नसते, तर कदाचित या नंतर भाजपात हे तरूण कार्यकर्ते कधीच मोठमोठ्या संस्थांवर पदाधिकारी म्हणून निवडून गेले नसते.


पण आज बी एस पाटील यांना मारहाण झाल्यानंतर जनतेत जो संदेश गेला तो गेलाच. पण एक चक्र येथे पूर्ण होत असल्यासारखं वाटतंय. भाजपची पहिली आमदारकी मिळाल्यानंतर, अमळनेर तालुक्यातील भाजपमध्ये वाढलेल्या पदाधिकाऱ्यांचा जो अश्वमेध जिल्ह्यात दबदबा निर्माण करत होता, तो आता येथेच येऊन थांबणार असल्यासारखं वाटतंय.


बी एस पाटील यांनी खासदारकीसाठी जेव्हा प्रयत्न सुरू केले, तेव्हा त्यांना खासदारकीचं तिकीट आलं नाही. ते ए टी पाटील यांच्याकडे गेलं, ते कसं गेलं. हे भाजपातील सर्वांना ठावूक आहे. जे बी एस पाटलांना नाही मिळालं, ते  तिकीट ए टी पाटलांना मिळालं, ते तिकीट मिळवून देणारं नेतृत्वही आज खस्ता खात आहे.


पण दुसरीकडे काही दिवसांनी उदय वाघ जिल्हाध्यक्षपदी आल्यानंतर, १५ वर्ष सामंजस्याने राजकारण करणारे डॉ. बी एस पाटील यांनी राजकारणपासून जेवढं दूर जायला पाहिजे होतं, जेवढं अंतर ठेवायला पाहिजे होतं, तेवढं ठेवलं नाही. किंवा जुन्या कार्यकर्त्यांना बांधून ठेवलं नाही, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर कधीच सोडायचं नसतं, या साध्या नियमाकडे त्यांनी डोळेझाक केली. 


या आधी खान्देश शिक्षण मंडळाच्या मिटिंगमध्ये बी एस पाटलांवर हात उचलण्याचा प्रकार ऐकीवात होता. तेव्हाच त्यांनी सावरायला पाहिजे होतं. आपली बॅकिंग संपतेय, याचा अंदाज त्यांनी घ्यायला पाहिजे होता.


या दरम्यान डॉ. बी एस पाटील यांचे एकेकाळचे समर्थक अनिल भाईदास पाटील आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याशी तालुक्याच्या राजकारणावरून ताळमेळ बसत नव्हता. म्हणून अनिल भाईदास पाटील यांनी राष्ट्रवादीची वाट निवडली. यात नगराध्यक्ष निवडणुकीत कार्यकर्ता आपल्यामागे उभा असल्याच्या परीक्षेत अनिल भाईदास पास झाले. 


आताच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा खासदार ए टी पाटील यांचे काही आक्षेपार्ह फोटो व्हॉटसअॅपवर व्हायरल झाले. यानंतर त्यांना तिकीटही मिळालं नाही. नेमकं तिकीट गेलं, ते भाजपाच्या विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांच्याकडे. यानंतर उदय वाघ यांचे पक्षातील अंतर्गत शत्रू खवळले. 


पारोळ्यात भाजपाविरोधात बंडाची तयारी करणारे खासदार ए टी पाटील यांनी सभा घेतली. हे तेच ए टी पाटील ज्यांना, याआधी भाजपाचं लोकसभेचं तिकीट मिळालं होतं आणि बी एस पाटलांचं कापलं गेलं होतं. पब्लिक मेमरी शॉर्ट मेमरी असते, असं म्हणतात, पण पुढाऱ्यांचीही तिच गत आहे. बी एस पाटील हे विसरले आणि त्यांनी आता पारोळ्यात ए टी पाटलाचं तिकीट का कापलं, या ए टी पाटील समर्थकांच्या सभेत उदय वाघ आणि स्मिता वाघ यांच्यावर, ए टी पाटलांसाठी सडकून टीका केली. आणि नको तेवढा रोष ओढवून घेतला.


या दवाबानंतर स्मिता वाघ यांचं तिकीट कापलं गेलं आणि चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना हे तिकीट देण्यात आलं. ही धुसफूस अनेक दिवसांपासून सुरू होती, ती या मेळ्याव्यात निघाली. यानंतर आता स्मिता वाघ यांचं तिकीट कापलं गेलं आहे, त्यांची वर्षभरात आमदारकीही पूर्ण होईल. उदय वाघ यांच्याकडे पुन्हा जिल्हाध्यक्षपद शाबूत राहिलं तर बरं, नाहीतर जळगाव जिल्ह्यात अमळनेर भाजपातून सुरू असलेला अश्वमेध येथेच थांबणार आहे.


ज्या प्रमाणे अनिल भाईदास पाटील यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार शिरीष चौधरी यांच्याशी वाद ओढवून घेतला, त्याच प्रमाणे कधीकाळी आपलं लोकसभेचं तिकीट कापलं गेलं होतं. हे विसरून, बी एस पाटील हे ए टी पाटलांसाठी सभा जिंकायला गेले आणि हे तीनही जवळचे, एकेकाळचे पक्षातले मित्र आता वेगळे लढतायत, कुणी अस्तित्वासाठी, कुणी आमदारकीसाठी, तर कुणी खासदारकीसाठी... या लेखात कुणाचंही मन दुखवण्याचा उद्देश नाही, अजिबातच नाही, कार्यकर्त्यांच्या भावना यात मांडण्याचा प्रयत्न आहे.