गुजरात निवडणुकीत लालकृष्ण अडवाणींचे स्थान काय?
आगामी गुजरात निवडणुकीचे बिगुल भाजपा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली फुंकत आहे. त्यासाठी १ ऑक्टोबरपासून अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली गौरव यात्रेचीही आयोजन करण्यात आले.
अण्णासाहेब चवरे, झी मीडिया मुंबई : आगामी गुजरात निवडणुकीचे बिगुल भाजपा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली फुंकत आहे. त्यासाठी १ ऑक्टोबरपासून अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली गौरव यात्रेचीही आयोजन करण्यात आले. विशेष असे की, १०१२ ते १०१४ पर्यंतची गुजरातमधील प्रत्येक निवडणूक ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच लढवली गेली. तरीही, पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची यात महत्त्वाची भूमिका राहिली होती. मात्र, भाजपातील सध्यास्थिती पाहता चित्र वेगळे दिसत आहे.
एके काळी गुजरातमध्ये नेतृत्व नरेंद्र मोदींचे आणि प्रचाराची धुरा लालकृष्ण अडवाणी यांची, असे समिकरण असायचे. मात्र, सध्या काही वेगळेच संकेत मिळत असून, लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचेच धोरण भाजपाने ठरवले आहे की, काय अशी चर्चा सुरू झाली आहे. २०१४ मध्ये लालकृष्ण अडवाणी गांधीनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. गेली २४ वर्षे ते याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. ज्या काळात लोकसभेत भाजपच्या केवळ दोनच जागा होत्या तेव्हापासून अडवाणी गांधीनगरमधून निवडून येत आहेत.
१९९०मध्ये सोमनाथ ते आयोध्या अशी रथयात्रा काढून देशातील वातावरण ढवळून काढणाऱ्या अडवाणी यांनी भारतीय राजकारणातला प्रदीर्घ काळ पाहिला आहे. भाजप आज देशातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तोही, कॉंग्रेससारख्या १५० वर्षांची परंपरा असलेल्या पक्षाला पराभूत करून. हे खरे असले तरी, त्यापाठीमागे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची दूरदृष्टी आणि त्याला मिळालेली लालकृष्ण अडवाणी यांची खंबीर साथ कारणीभूत आहे. या दोन चेहऱ्यांनी आपले अवघे जीवन भाजपच्या उभारणीत खर्च केले आहे. सध्या अटलबिहारी वाजपेयी सार्वजनिक जीवनातून बाहेर पडले आहेत. पण, अडवाणी अद्याप कार्यरत आहेत. अडवाणी यांच्यानंतर भाजपकडून पंतप्रधान पदाचा प्रमुख चेहरा म्हणूनही अडवाणींकडे पाहिले जायचे. मात्र, राजकारणात काहीही होऊ शकते या उक्तीनुसार गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना ओव्हरटेक केले. विशेष असे की, मोदींच्या राजकीय जडणघडणीत आडवाणींचा मोठा वाटा आहे.
सध्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. देशात निर्माण झालेले भाजपविरोधी वातावरण आणि कॉंग्रेसची सत्तेतील पुनरागमनाची धडपड पाहता त्याचे परिणाम गुजरातमध्ये दिसले नाहीत तर नवल. अशा स्थितीत भाजपसाठी लालकृष्ण अडवाणी संकटमोचक ठरू शकतात. मात्र, भाजपातील सध्याचे चित्र पाहता अडवाणी राजकीय अडगळीत पडल्याचे दिसते. नेतृत्व ज्येष्ठता आणि अनुभव बाजूला ठेवत अडवाणी यांना अनेक महत्त्वाच्या पदावरून दूर ठेवले जात आहे. २०१४ च्या निवडणुकीत त्यांच्यासोबत जे पंतप्रधान पदाबाबतीत घडले. तेच, राष्ट्रपती पदाबाबतही घडले. आता तर, गुजरात विधानसभा निवडणुक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याच नेतृत्वाखाली लढली जात आहे. नाही म्हणायला त्यांना भाजपच्या सल्लागार समितीत स्थान देण्यात आले आहे. पण, ते नाममात्रच. हे सर्व चित्र पाहता भाजप लालकृष्ण अडवाणी यांना जबरसत्तीने निवृत्त करण्याचे संकेत तर, देत नाही ना? अशी शंका येते.