जयंत माईणकर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस यासह इतर समविचारी पक्षांना एकत्र घेऊन महाआघाडी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सत्ताधारी भाजपला कडवे आव्हान देण्याला उत्तर प्रदेश मधील फुलपूर, गोरखपूर आणि कैराना पोट निवडणुकीत निदर्शनास आलं आहे. 


समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष या दोन विल्या भोपळ्याएवढे संख्या असणाऱ्या पक्षांचे नेते एकमेकांना बबूआ- बुआ म्हणत एकत्र आले आणि अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोक दल आणि काँग्रेसच्या साह्याने त्यांनी भाजपचा पराभव केला. 


काहीशा त्याच पद्धतीच्या महाघाडीची महाराष्ट्रात पुनरावृत्ती करण्याची चव्हाणांची कल्पना आहे. महाराष्ट्रात याआधी  हा प्रयत्न १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी केला होता.


रिपब्लिकन पक्षाच्या चार उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांनी त्यांना निवडून आलेच पण त्याचबरोबर १९९६ साली ज्या काँग्रेस पक्षाचे फक्त  १५ खासदार  निवडून असले होते त्या कॉग्रेसचे या आघाडीमुळे 33 खासदार महाराष्ट्रातून निवडून आले.


१९८९ च्या लोकसभा निवडणुकीपासून एक बाजूला हिंदुत्व समर्थक आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस, समाजवादी आणि इतर समर्थक अशा प्रकारे मतविभागणी होऊ लागली. भाजप विरोधी मतविभागणी चा फायदा अर्थात भाजप ला मिळाला. 


१९९८ साली महाराष्ट्रात भाजपविरोधी मतांची विभागणी रोखण्याचा प्रयत्न पवारांनी रिपब्लिकन पक्षाच्या साथीने केला आणि त्यात ते मोठ्या प्रमाणात यशस्वी ही ठरले होते.


सध्या देशातील काँग्रेसची लोकसभेतील परिस्थिती पाहता देशातील जवळपास सर्वच राज्यात कोणत्या ना कोणत्या प्रादेशिक पक्षाशी आघाडी करणे क्रमप्राप्तच आहे.


या महाआघाडीची सुरुवात उत्तर प्रदेशपासून झाली आहे. सपा आणि बसपा या दोन पक्षांबरोबर उत्तर भारतातील इतरही राज्यात आघाडी होण्याची शक्यता आहे.  अर्थात ही आघाडी झाल्यास त्याचा फायदा काँग्रेस लाच होईल आणि फटका मात्र भाजपला बसेल. 


भाजपला टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसला जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स बरोबर, दिल्लीमध्ये आप बरोबर आघाडी करावी लागेल. 


महाराष्ट्रात ही आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, भाकप, शेकाप, रिपब्लिकन पक्ष, सपा, बसपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी या सर्व पक्षांना एकत्र करून भाजपविरुद्ध एक  महाआघाडी करण्याचा काँग्रेस चा प्रयत्न आहे. 


ही आघाडी झाल्यास सत्ताधारी भाजपला प्रत्येक जागेसाठी चांगलेच झुंजावे लागेल. दुसरीकडे भाजप. शिवसेना युती, ते आपसात कितीही भांडले तरीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येतील अशीच राजकीय हवा आहे.