रामराजे शिंदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मीडिया, दिल्ली


मुसाफिरखानाचा अर्थ आहे धर्मशाळा... कोणत्याही बाहेरून आलेल्या पाहुण्यांसाठी मुक्काम करण्याचं ठिकाण... परंतु मुसाफिरखाना म्हणजे आत्ताचा अमेठी लोकसभा मतदारसंघ... पूर्वी अमेठी मतदारसंघाचं नाव मुसाफिरखाना होतं. मुसाफिरखाना मतदारसंघ १९५७ मध्ये अस्तित्वात आला तर १९६७ मध्ये मुसाफिरखाना ऐवजी 'अमेठी'चं नाव मतदारसंघाला दिलं गेलं. सध्याच्या परिस्थितीत मुसाफिरखानामध्ये अमेठीची तहसील आहे. अमेठी मतदारसंघाचा प्रवास मुसाफिरखाना मतदारसंघापासून सुरू झाला. पुढे देशाच्या राजकारणानं असं वळण घेतलं की, मुसाफिरखाना येथे आलेले 'मुसाफिर' देशपातळीवर बडे नेते झाले... पंतप्रधानही झाले...


१९६२ मध्ये रणंजय सिंग काँग्रेसच्या तिकिटावर मुसाफिरखानामधून संसदेत पोहोचले. १९६७ मध्ये अमेठी मतदारसंघ बनला. १९७१ मध्ये काँग्रेसचे विद्याधर वाजपेयी लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर १९७७ मध्ये संजय गांधी यांनी अमेठीतून निवडणूक लढविली. परंतु जनता पार्टीचे रविंद्र प्रताप सिंग यांनी संजय गांधी यांचा पराभव केला. पुन्हा १९८० मध्ये संजय गांधी यांनी निवडणूक लढविली आणि विजयी झाले. परंतु १९८० मध्येच झालेल्या विमान अपघातात संजय गांधी यांचे निधन झाले. त्यानंतर १९८१ मध्ये राजीव गांधी यांनी निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. त्यानंतर १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी यांनी निवडणूक लढविली परंतु निकाल येण्यापूर्वीच त्यांची हत्या झाली. त्यावेळी पहिल्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी झालं आणि दुसऱ्याच दिवशी राजीव गांधी यांची हत्या झाली. तेव्हा राजीव गांधी प्रचार करत होते. नंतर अमेठीत पोटनिवडणूक घ्यावी लागली... संजय गांधी आणि राजीव गांधी दोघेही 'मुसाफिर' बनून अमेठीत आले मात्र दोघांनाही अमेठीत जास्त काळ घालवता आला नाही. संजय गांधी यांनी ५ वर्षे तर राजीव गांधी यांनी १० वर्षे अमेठीचे नेतृत्व केले. ते 'मुसाफिर'च राहिले. सोनिया गांधींनीही पाच वर्षे अमेठीचे नेतृत्व केले. राहुल गांधी सर्वाधिक कालावधी, १५ वर्षांपासून अमेठीचे नेतृत्व करत आहेत. ते इथून निवडून आले तरी त्यांचं मन मात्र दिल्लीत रमतं. राहुल गांधी कधीकधी अमेठीला येत असल्यामुळे आजही गांधी घराणं अमेठी वासियांसाठी 'मुसाफिर' आहे... तर भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी या मूळ अमेठीच्या रहिवाशी नसल्यामुळे त्यासुद्धा 'मुसाफिर'च आहेत.


अमेठीच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला असता, १९८४ ची लोकसभा निवडणूक गांधी विरूद्ध गांधी झाली होती. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी अमेठीतून अर्ज दाखल केला. त्यावेळी राजीव यांच्याविरोधात संजय गांधी यांच्या पत्नी मनेका गांधी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. मात्र इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर भावनिक लाट निर्माण झाली होती. त्याचा फायदा काँग्रेसला झाला. मनेका गांधी यांना केवळ ५० हजार मते मिळाली. खरं तर अमेठी मतदारसंघावर राजीव गांधी कुटुंबाची पकड राहिली. संजय गांधी कुटुंबाला मात्र पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मनेका गांधी यांना जनतेनं नाकारले. विशेष म्हणजे अगोदर संजय गांधी आणि नंतर मनेका गांधी दोघांनाही अमेठीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. इथे आत्तापर्यंत १६ लोकसभा आणि दोन पोटनिवडणुका झाल्या. त्यापैंकी १६ वेळा काँग्रेस विजयी झाली. फक्त १९७७ मध्ये लोकदल आणि १९९८ मध्ये भाजपला या मतदारसंघावर कब्जा करता आला. आता पुन्हा अमेठी लोकसभा मतदारसंघ व्हीव्हीआयपी बनला आहे. कारण स्मृती इराणी केंद्रीय मंत्री, अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी मागील पाच वर्षापासून अमेठीत अनेक दौरे केले. राहुल गांधी यांच्यासमोर सक्षम आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला.


मुसाफिरखाना

'स्मृती'साठी 'डू ऑर डाय'


स्मृती इराणी यांनी मागील निवडणुकीत चांगली कामगिरी केली. परंतु आता केवळ एकच गोष्ट त्यांच्या विरोधात गेली. ते म्हणजे अमेठीवासियांना चप्पला वाटण्याचे प्रकरण... हाच मुद्दा घेऊन प्रियंका आणि राहुल गांधी यांनी अमेठीवासियांचा अपमान असल्याचा प्रचार केला. त्यावर स्मृती इराणी बॅकफूटवर जाताना पाहायला मिळालं. भाजपने अमेठीत महिलांमध्ये कामगिरी चांगली केली असली तरी स्मृती इराणी यांच्यासाठी 'डू ऑर डाय'ची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, स्मृती इराणी यांनी ५ वर्षात जेवढी धावपळ केली तेवढी पुढील पाच वर्षांत करू शकत नाही. त्यामुळे आत्ता नाही तर कधीच नाही, असे स्वत: भाजपचेच कार्यकर्ते म्हणत आहेत. त्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघात ५ विधानसभा येतात. तिलोई, जगदीशपूर, अमेठी, गौरीगंज आणि रायबरेली जिल्ह्यातील सलोन विधानसभा येते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पाचपैंकी ४ जागांवर भाजप आणि एका जागेवर सपाने विजय मिळवला. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसला तिलोई आणि सलोनमधून चांगले मताधिक्य मिळाले होते. याच सलोन आणि तिलोईवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. सलोन मतदारसंघ भाजपच्या हातात आला तर अमेठीसुद्धा दूर नाही. सलोनमधून भाजपा लीड मिळावी म्हणूनच रायबरेलीचा काँग्रेसचा विद्यमान आमदार दिनेश प्रताप सिंग याला फोडून भाजपमध्ये आणला आहे. दिनेश प्रताप सिंग भाजपसाठी कितपत फायदेशीर ठरतो, हे पहावं लागेल.


सपा-बसपा हाथ, काँग्रेस के साथ


अमेठीचा विचार केला तर ४ लाख मुस्लीम, साडे तीन लाख दलित मतदार आहेत. १२ ब्राम्हण तर उर्वरित पासी, यादव आणि राजपूत समाज आहे. भाजपने ओबीसी, क्षत्रिय आणि ब्राम्हण मतांकडे लक्ष दिले आहे. या तिघांचीही आकडेवारी जास्त होते. अशा परिस्थिती भाजपचा विजय होऊ शकतो. परंतु राहुल गांधी यांना समाजवादी पार्टी आणि बसपने पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी यांची पहिला सभा तिलोई मतदारसंघात झाली. त्या सभेत व्यासपीठावर सपा आणि बसपाचे नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांनाच पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तीच परिस्थिती रायबरेलीमध्ये आहे. तिथेही सपा आणि बसपने आपला उमेदवार दिला नाही. यूपीमध्ये केवळ अमेठी आणि रायबरेलीमध्ये सपा आणि बसपाने आपला उमेदवार दिला नाही. इतर ठिकाणी मात्र काँग्रेस आणि महाआघाडी समोरासमोर लढत आहे.


अमेठी का एमपी, भावी प्रधानमंत्री


काँग्रेसनं पूर्ण प्रचार राहुल गांधी यांच्याभोवती ठेवला आहे. 'अमेठी का MP, 2019 का PM,' असे पोस्टर अमेठीत सर्वत्र दिसून येतात... राहुल गांधी यांच्या सभेच्या ठिकाणीसुद्धा ‘भावी प्रधानमंत्री’ राहुल गांधी का स्वागत असंच लिहल्याचं दिसून आलं. त्यातून एक संदेश अमेठीवासियांमध्ये गेला. राहुल गांधी आज ना उद्या पंतप्रधान होणार आहेत. परंतु जर अमेठीतून पराभव झाला तर पंतप्रधानांचा मतदारसंघ म्हणून अमेठीची ओळख नष्ट होईल. राहुल गांधी पंतप्रधान झाले तर अमेठीला आणखी चांगले दिवस येतील, अशी लोकांची आशा आहे. अमेठी-गौरीगंजमधील चहावाल्याला विचारलं की, राहुल गांधी यांना मत देणार का? त्यावर तो म्हणाला, आमच्या मतदारसंघातील पंतप्रधान पाहायला आम्हाला आवडेल. राहुल गांधी पुढे कधी पंतप्रधान बनतील. राहुल गांधी यांना मत दिले नाही तर अमेठीची ओळख आणि महत्त्व पण संपून जाईल. या प्रतिक्रीयेतून लोकांच्या मनात काय आहे, हे समजलं. स्मृती इराणी विकासाच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांच्याविरोधात प्रचार करत आहे. परंतु आता भावनिक आधारावर अमेठीत मतदान होईल. मुसाफिरखाना पुन्हा राहुल गांधी यांना आश्रय देईल, असंच दिसतंय.


अमेठी मतदार संघातून... 

कुणाचा टक्का वाढणार?


राहुल गांधी यांनी आगोदर २००४, २००९ आणि २०१४ मध्ये अमेठीतून निवडणूक लढविली. यापैंकी २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत वैशिष्ट्य होते की, त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला १ लाख मतांच्या पुढे जाऊ दिले नाही. २००४ मध्ये दुसऱ्या क्रमांकावरील बसपा उमेदवार चंद्र प्रकाश मिश्रा यांना ९९ हजार ३२६ मते मिळाली. त्यानंतर २००९ मध्ये बसपाचे आशिष शुक्ला यांना ९४ हजार मते मिळाली. परंतु २०१४ मध्ये हा नियम मोडीत निघाला. मोदी लाटेत स्मृती इराणी यांना ३ लाख ७४८ मते मिळाली तर राहुल गांधी यांना ४ लाख ८ हजार मते मिळाली. राहुल गांधी केवळ १ लाख ७ हजार मतांनी निवडून आले. आता प्रश्न असा आहे की, २०१९ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांचे मताधिक्य १ लाखापेक्षा कमी होईल की वाढेल. परंतु सध्याची परिस्थिती पाहता राहुल गांधी यांचे मताधिक्य वाढण्याची शक्यता आहे. त्याचे कारण आहे, शेतकरी आणि महिला वर्ग. भाकड गायी शेतात घुसून नुकसान करत असल्यामुळे शेतकरी भाजप सरकारवर नाराज आहे तर नीलगायला मारण्यास यूपी सरकारने मनाई केली आहे. तर दुसरीकडे गौशाळा बांधल्या नाहीत. शेतक-यांचा असंतोषाचा फटका भाजपला बसेल.


दुसरं म्हणजे २०१४ मध्ये महिला मतदारांनी भाजपला मतदान केले. त्यामुळे महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राहुल गांधी यांनी न्याय योजना आणली. ते प्रत्येक सभेत आवर्जुन सांगत आहेत की, या योजनेचा पैसा महिलेच्या खात्यात जमा होणार आहे. पुरूषांकडे दिला जाणार नाही. त्यामुळे यावेळेस राहुल गांधी यांच्या सभेत महिला मोठ्या प्रमाणावर दिसून आल्या. अमेठीतील तरूणाईमध्ये सध्या मोदींची लाट दिसते. उघडपणे युवक बेरोजगाराबद्दल बोलत आहेत. राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विजयाची भिस्त शेतकरी आणि महिला वर्गावर आहे.



अमेठीत 'विकास' कशाशी खातात हे माहीत नाही. अजूनही खेडेगाव असल्याचं फिरल्यानंतर जाणवतं. अमेठी दोन किमीच्या आत पूर्ण गाव संपतं. आत्तापर्यंत अमेठीत जिल्हाधिका-यांचं कार्यालय नव्हतं. मागील काही महिन्यापूर्वी भाजपने कार्यालय स्थापन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे कोच फॅक्ट्री स्थापन केली. अमेठीतील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. राहुल गांधी यांनी खासदार निधी कुठे वापरला? हाच प्रश्न आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात काही प्रमाणात वातावरण निर्मिती झाली आहे. युवकांच्या मनात मोदींनी घर केलंय. 'अँटी इन्कम्बन्सी' वाढली तर २०२४ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना विचार करावा लागेल. कदाचित पुढीलवेळी रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून प्रियंका गांधी निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुसाफिरखाना पुन्हा नव्या 'मुसाफिर'चं स्वागत करण्यास तयार होईल.