(खासदार अमर साबळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार, या भविष्यवाणी नंतरचा आणखी एक काल्पनिक सोहळा!)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड आटपाट नगरीत काका-पुतण्याबरोबर केलेल्या तुंबळ लढाईनंतर महेश अर्थात राम आणि लक्ष्मण जोडीने अशक्यप्राय विजय संपादित केला. या विजयाची परतफेड म्हणून देवेंद्र राजांच्या दरबारी अष्टप्रधान मंडळात स्थान मिळेल, अशी आशा राम आणि लक्ष्मण बाळगून होते! आज ना उद्या राजा प्रसन्न होईल, असा विश्वास राम-लक्ष्मण जोडीला होता! त्याच विश्वासावर ही जोडी दिवस ढकलत होती!


पण, आज अचानक चंद्ररंग बंगल्यात मोठी गडबड सुरू झाली. अर्ध्या नगरीचे राजे लक्ष्मण चंद्ररंग महालात मोठ्या चिंतेने चकरा मारत होते. संतापाने त्यांचे डोळे लाल झाले होते... त्यांचा हा अवतार किती तरी दिवसांनी महालातील लोक पाहत होते! 'स्वयंघोषित महायोद्धा'ही त्यांच्यापुढे जायला धजवत नव्हता. महालात नीरव शांतता पसरली असताना अचानक राजांनी हात वर करत सवाल केला... अरे आम्हीच असे कमनशिबी का... या नगरीत सत्ता मिळावी म्हणून आम्ही पुतण्याशी वैर घेतले! अरे काय केले नाही... किती जणांना फोडले, रात्रीचा दिवस केला आणि तरीही आम्हास ही शिक्षा... लक्ष्मण राजांचा हा संताप पाहून चंद्ररंग महाल थबकला. कोणाला काय झाले? हेही कळेना. सर्वजण स्तब्ध होऊन पाहत होते.


तिकडे महेश अर्थात रामाच्या महालात ही काही वेगळी स्थिती नव्हती... मुळात पैलवान गडी असलेल्या रामाचा अवतार पाहून सगळेच थक्क झाले. चाणक्य कार्तिक, दुसरा चाणक्य प्रसाद... कुणाला काही कळायला मार्ग नव्हता. रामानेही आकाशाकडे हात उंच करत संतापलेल्या आवाजात सवाल केला... काय चुकले आमचे? पहिल्यांदा विलासरुपी गुरूचा विरोध पत्करला... त्यानंतर अजित पुतण्याचा विरोध पत्करला... सत्ता खेचून आणली आणि तरीही आमच्या नशिबी हेच... कार्तिक, प्रसाद हे रौद्र रूप पाहून थक्क झाले... पण त्यांनाही काही कळेना.


पण, शहरातल्या साबळेंच्या अमर महालात मात्र सगळीकडे मंगलमय वातावरण होते... सनईचा मंगल सूर वातावरणातली प्रसन्नतेची अधिकच जाणीव करून देत होती. कन्या वेणू जातीने हर्षोत्सवाची आखणी करण्यात दंग होती... माऊलीचा आनंद तर सांगायलाच नको... आणि दिल्लीत इमाने इतबारे हजेरी लावणाऱ्या अमर यांचा चेहरा तर आनंदाने प्रफुल्लीत झालेला... कारण काय अहो दिल्लीवरून खलिता मिळालेला... थेट केंद्रीय अष्टप्रधान मंडळात मिळाल्याची वार्ता मिळालेली... वाढदिवसाच्या कार्यक्रमात दिल्लीतल्याच ए. टी. नाना पाटील यांनी केलेल भाकीत खरे ठरले... अहो अमरराव थेट दिल्लीच्या अष्टप्रधान मंडळात स्थान मिळाले... मग काय आनंदोत्सव होणारच...


ही वार्ता राजा लक्ष्मण आणि राजा महेश अर्थात रामाच्या महालात जाऊन धडकली... आणि आता सगळयांना राजाच्या संतापाचे कारण समजेल... मग महायोद्धा काय, चाणक्य कार्तिक काय आणि प्रसाद काय सगळेच हवालदिल झाले... अरे काय हा नियतीचा प्रताप, असा प्रश्न सगळ्यांना पडला असतानाच कसला तरी आवाज झाला आणि राजे लक्ष्मण, राजे राम अर्थात महेश, स्वयंघोषित महायोद्धा, चाणक्य कार्तिक आणि प्रसाद सर्वच जणांनी डोळे उघडले... सर्वांना एकच स्वप्न पडले होते, हे त्यांच्या लक्षात आले आणि सर्वांनी सुस्कारा सोडला. पण, त्याचवेळी सर्वांना एकच स्वप्न पडले म्हणजे ते खरे तर होणार नाही ना? या चिंतेने सगळ्यांना ग्रासले आणि नगरीत राजकारणाचे आणखी एक वर्तुळ पूर्ण झाले...