दीपाली जगताप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मीडिया, मुंबई


हाय... मी मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी बोलतोय... आजपर्यंत हे वाक्य अभिमानानेच बोलत आलोय. पण आज माझी व्यथा सांगण्यासाठी मी मुंबई विद्यापीठाचा पदवी परीक्षेचा विद्यार्थी आहे, हे वाक्य पुरेसे आहे.


गेल्या तीन महिन्यांपासून मला झोप लागत नाहीय. उद्याचा सूर्य निकालाचा प्रकाश घेवून येईल, या आशेने कसा तरी झोपतो पण हाती आमवस्येचीच रात्र येते. या परीक्षेत चांगले मार्क मिळवले तरच फ्युचर आहे, असं मला दिवस रात्र सांगण्यात आलंय. सहा सेमिस्टरच्या परीक्षा, इंटरनल मार्क, प्रोजेक्ट्स, त्यात क्रेडिट सिस्टम या सगळ्याशी जुळवून जे जे सांगण्यात आलं ते सगळं मी प्रामाणिकपणे केलं. म्हटलं एकदा कॉलेजमधून बाहेर पडलो की झालं. अनेक ठिकाणी एन्ट्रन्स एक्झाम दिली. तीही पास झालो... झालं आता आणखी दोन वर्ष पोस्ट ग्रॅज्यूएशन केलं तर या दहा कंपन्यांमध्ये तर जॉब मिळेलंच आपल्याला... इतकं काटेकोर नियोजन केलं. 


तसं मला लहानपणापासूनच हे प्लॅनिंग शिकवण्यात आलं. दहावी, बारावी, एन्ट्रन्स परीक्षा, डिग्री कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि मग चांगल्या पगाराची नोकरी ही सिस्टम माझ्यात शाळेत असल्यापासूनच फिट करण्यात होती. मी फक्त त्याचे पालन करत आलो. पण हे काय...? तीन महिने झाले तरी मला डिग्रीचा निकालच मिळत नाहीय. चार विविध विद्यापीठांना पुढील शिक्षणासाठी अर्ज केलेत. पण आता त्या तारखाही उलटून गेल्यात. आता यात माझी काय चूक? माझा निकाल आला असता तर सहज प्रवेश मिळाला असता इतका अभ्यास मी केला होता. लहानपणापासून शाळेत, कॉलेजमध्ये २० वर्ष मेहनत केली आणि त्यांनी तीन महिन्यात माझ्या स्वप्नांवर पाणी फेरलं. आता मी काय करायचं? बरं इतकं होऊन मी प्रश्नही विचारु शकत नाही. कुणाला विचारायचा? 


मला आठवतंय सेकंड ईअरला आजारी असल्याने एक प्रोजेक्ट डेडलाईन नंतर सबमीट करायला गेलो तर माझ्या मॅमने तो घेतला नाही. त्यावेळी मेडीकल सर्टीफीकेट मिळवून त्या प्रोजेक्टला तरीही लेट मार्कचा शेरा दिला. पण इथे तर एक नव्हे तर सगळ्या कॉलेजांचं प्रमुख म्हणजे विद्यापीठ ज्याने तब्बल ४ डेडलाईन चुकवल्या... त्याचे काय? त्यांना काहीच शिक्षा नाही? मी साधा हा प्रश्न विचारु शकत नाही? माझ्या मित्राला तर शिक्षणासाठी अमेरीकेत जायचंय. किती मेहनत केली त्याने... त्याचे आई-वडील तर दिवस-रात्र अमेरिकेच्या विद्यापीठाची आठवण करुन द्यायचे. पण आता तर साधा विजा निकालाशिवाय मिळू शकत नाहीय. त्याने काय करायचे? ७५ टक्के हजेरी नव्हती म्हणून आमच्या क्लासमधील अनेक जणांना परीक्षेला बसू दिलं नाही. हजारो रुपये दंड भरावा लागला आणि परीक्षा दिली. पण इथे तर ४५ दिवसांत लावायचा निकाल आज ९० दिवस उलटले तरी लागत नाही. पण आम्ही काय करणार? आम्ही तर साधा प्रश्न विचारु शकत नाही. 


ज्या कॅम्पसमध्ये जाण्याचे स्वप्न पाहिले तिथला प्रवेश तर हुकला... मला आठवतंय एकदा कॉलेजच्या डिबेटमध्ये तरुण मुलांना परदेशात स्थायिक व्हायचे वेड का असते? देशासाठी काही करण्याची तयारी नाही आणि नुसती नावं ठेवण्याची सवय... या विषयावर भांड-भांड भांडलो... पण आता रात्रभर हाच विचार करत होतो, की आपल्या देशांतील एक नामांकीत विद्यापीठ ज्याला १६० वर्षांचा इतिहास आहे ते विद्यापीठ साधे निकाल वेळेवर लावू शकत नाही. निकाल लावलाच तर त्यातही घोळ, तो घोळ सुटत नाही तोपर्यंत केटीची परीक्षा आलेलीच असते आणि केटी दिल्यावर कळते पुर्नमुल्यांकनात तर आपण पास झालोय. यात आनंद मानायचा आणि सोडून द्यायचे. पण सुधारणा आपल्यापासून होते अशी समजूत असणाऱ्या माझ्या सारख्या तरुणांनी करायचे काय? आम्हाला साधं उत्तर विचारण्याची संधी नाही. मग करायचे काय? धिंगाणा घालायचा? आंदोलनं करायची? तोडफोड करायची? की सभ्य घरातला मुलगा म्हणून घरी रडत बसायचे? आता सनी देओलसारखं तारीख पे तारीख ओरडू नाही शकत... ना रंग दे बसंती सिनेमासारखं हातात बंदुका घेवू शकत... आणि ना युवा सिनेमासारखं स्वत:चा राजकीय पक्ष सुरु करु शकत. कोर्टात जायचं म्हटलं तर वकिलाला पैसे द्यावे लागणार... आपण अजून कमावत तर नाही त्यात शिक्षणासाठी पैसे खर्च करायचे की निकाल मिळत नाही म्हणून वकिलाला आपणच पैसे द्यायचे? मग काय करायचे तुम्हीच सांगा? 


समजा निकाल वेळेवर लागले असते आणि मी नापास झालो असतो. केटी देऊन पास होण्यात हेच तीन महिने गेले असते तर आई-बाबांनी बोलून बोलून मला घर सोडण्याची वेळ आणली असती... कारण माझ्यात तेवढी इनवेस्टमेंटच केली आहे. पण आता ते तरी काय करणार... दररोज बातम्या वाचून तण-तण करतात आणि कामावर जातात. 


पण तरीही दररोज शांत बसायचे... विद्यापीठाची वेबसाईट सुरु करायची, जी हल्ली बंद असते.. आपला निकाल लागलाय का पहायचे... नसेल तर लॅपटॉप सुरु करुन गेम ऑफ थ्रोन्सचे एपिसोड पहायचे... या पलिकडे मी 'मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी' काहीच करु शकत नाही...